सोलापूर : अखेर 44 त्रुटींची पूर्तता; प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेची प्रतीक्षा

सोलापूर : अखेर 44 त्रुटींची पूर्तता; प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेची प्रतीक्षा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने काढलेल्या 45 त्रुटींमुळे विजापूर रोडवरील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय मागील तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे सामान्य सोलापूरकर व पर्यटकांची निराशा होत होती. दरम्यान, महापालिकेच्या वतीने केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाची मान्यता कायम ठेवण्यासाठी 45 पैकी तब्बल 44 त्रुटी पूर्ण केल्या आहेत. लवकरच ही समिती प्राणिसंग्रहालयाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. चिडियाघर प्राधिकरणाच्या त्रुटींची पूर्तता झाली तर लवकरच नागरिकांसाठी महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय सुरू होणार आहे.

सोलापूर शहरातील विजापूर रोड येथे महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय असून या प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. मात्र, केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालय सुरू करण्यासाठी तब्बल 45 त्रुटी काढल्या आणि त्रुटींची पूर्तता करा, अन्यथा प्राणिसंग्रहालय बंद करा, असे आदेश दिले होते. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून हे प्राणी संग्रहालय बंद होते. या तीन वर्षार्ंत महापालिकेच्या वतीने तब्बल 44 त्रुटींची पूर्तता केली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाच्या वैभवात भर पडली आहे. दिल्लीची टीम पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे स्वच्छतेसह विविध कामे युध्दपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीच्या टीमने मान्यता दिल्यास जुलैअखेर किंवा ऑगस्टमध्ये प्राणी संग्रहालय सुरू होण्याची शक्यता आहे.

प्राणी संग्रहालयातील ठळक बाबी

  • प्राण्यांसाठी आठ पिंजरे, प्राण्याांसाठी स्वतंत्र असे किचन स्टोअर
  •  हरणांसाठी स्वंतत्र पिंजरा, प्राण्यांसाठी स्वंतत्र पाण्याची सोय
  •  प्राण्यांसाठी दवाखान्याचे काम अंतिम टप्प्यात
  •  प्राण्यांना चांगला खुराक दिल्यामुळे प्राणी झाले सुदृढ
  •  मृत प्राण्यांसाठी स्मशानभूमी, पोस्टमार्टेंमची केली सोय
  •  प्रत्येक पिंजर्‍यात सर्व सोयींनीयुक्त शेड
  •  रस्ते, स्वच्छता, वृक्षलागवड

प्राण्यांची संख्या

मगर – 17
बिबट्या – 4
सांबर – 12
माकड – 8
रेसेस माकड – 6
चितळे – 59
काळवीट – 15
मोर – 3

या केल्या सुविधा

संग्रहालयाच्या चारी बाजूंनी संरक्षक भिंत बांधली आहे. वृक्षलागवड, प्राण्यांसाठी किचन घर, दवाखाना उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत काढण्यात आले. पाण्याचे फवारे, प्रत्येक पिंजर्‍यात सर्व सोयींनीयुक्त शेड उभारण्यात आले. रस्ते, वीज, पथदिवे, गवत, सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. प्राण्यांची निगा राखण्यासाठी जास्त भर देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news