अजबच! प्राणीसंग्रहालयातील वाघ, सिंहासह सर्व प्राण्यांना कुलरची सुविधा | पुढारी

अजबच! प्राणीसंग्रहालयातील वाघ, सिंहासह सर्व प्राण्यांना कुलरची सुविधा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वत्र सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भातही उकाडा अतिप्रमाणात वाढलेला आहे. या दरम्यान माणसांबरोबरच पशु-पक्षीही उन्हामुळे हवालदिल झाले आहेत. या उन्हापासून प्राण्यांचा बचाव होण्यासाठी, नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसाठी खास कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, मगर, अजगर यांच्यासह 200 हून अधिक वन्यजीवांचा समावेश आहे. या उन्हापासून प्राण्यांच्या बचावासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरच्या या प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांमध्ये हिरवी जाळी लावण्यात आली असून, पिंजऱ्यांसोबत गोणी बांधून या गोण्या सतत ओल्या ठेवल्या जात आहेत. हिरव्या जाळ्यांसोबतच पिंजऱ्यांमध्ये कुलरही बसवण्यात आले आहेत.पिंजऱ्यातील तापमान सामान्य राहावे आणि उन्हापासुन प्राण्यांचा बचाव व्हावा असा या मागचा उद्देश आहे. या सोबतच अस्वल आणि बिबटाच्या पिंजऱ्यात ठराविक अंतराने पाण्याचे फवारे देऊन वातावरण थंड ठेवण्याची, व्यवस्था प्राणीसंग्रहालयमार्फत करण्यात आली आहे.

महाराजबाग प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. अभिजीत मोटघरे म्हणाले, नागपुरातील तापमान सध्या ४० अंश ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्राण्यांना थंड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तापमान ४५ अंशाच्या आसपास गेल्यास प्राण्यांना त्यांच्या अन्नात ग्लुकोज दिले जाते, प्राण्यांना रसदार फळ दिली जात आहेत. जेणेकरून या प्राण्यांना उष्माघाताचा धोका कमीत-कमी होऊ शकेल.

हेही वाचा :

Back to top button