सोलापूर: रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा; दीड कोटींचा दंड वसूल | पुढारी

सोलापूर: रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा; दीड कोटींचा दंड वसूल

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा: सोलापूर विभागात एप्रिलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २४ हजार ५०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून एक कोटी ४९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाणिज्य विभागाने ही कारवाई सोलापूर स्थानकासह वेगवेगळ्या रेल्वे गाडीत केली आहे.

सोलापूर विभागात एप्रिलमध्ये विविध प्रकारच्या कारवाईत एकूण २५ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक कोटी ५२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर यात २४ हजार ५०० प्रवासी विना तिकीट, अनियमित प्रवास, राखीव नसलेले सामान इत्यादीतून १ कोटी ४९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल महिन्यात एकूण ९१९ तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आल्या.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या मदतीने करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवाशांनी अधिकृत प्रवास तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रवासाच्या शेवटच्या क्षणी आरक्षण सुविधा देण्यासाठी, चार्ट तयार झाल्यानंतर आणि रेल्वेच्या नियोजित प्रस्थानाच्या ३० मिनिटे आधी प्रवासी चालु आरक्षण सुविधेचा लाभ घेऊ शकतात. रांगेत उभे राहू नये म्हणून प्रवाशांना निवडक स्थानकांवर स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशिन्स वरून तात्काळ अनारक्षित तिकिटांची सुविधा मिळू शकते. तसेच त्रासमुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वेने सतत प्रयत्नशील असताना युटीएस मोबाइल अँप उपलब्ध करून दिले आहे. ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट याद्वारे बुक करू शकतात. तरी सर्व प्रवाशांनी रेल्‍वे प्रवास करताना, अधिकृत तिकीट घेऊनच रेल्‍वे प्रवास करावा.

हेही वाचा 

Back to top button