सातारा पालिकेचा कार्यकाल संपला आजपासून | पुढारी

सातारा पालिकेचा कार्यकाल संपला आजपासून

सातारा : पुढारी वृत्तसेवा; सातारा नगरपालिकेतील पार्लमेंटरी बोर्डाची मुदत दि. 26 रोजी संपली. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांवर मर्यादा आल्या आहेत. दि. 27 रोजीपासून प्रशासकीय राजवट लागू होत आहे. प्रशासक म्हणून कोण येणार याची उत्सुकता नगरपालिका वर्तुळात आहे.सातारा पालिकेची निवडणूक झाल्यानंतर 26 डिसेंबर 2016 रोजी सर्वसाधारण सभा होवून नवीन पार्लमेंटरी बॉडी अस्तित्वात आली. त्यानंतर पाच वर्षांनी निवडून आलेल्या बॉडीची मुदत 26 डिसेंबर 2021 ला संपली. मुदत संपण्यापूर्वी दोन दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे दि. 24 रोजीच नगरपालिकेत ‘निरोप समारंभ’ सोहळा पार पडला.

भावनिक निरोप सोहळा

मुदतीतील कार्यालयीन कामकाजाचा अखेरचा दिवस असल्यामुळे बर्‍याच पदाधिकार्‍यांनी, नगरसेवकांनी शुक्रवारी नगरपालिकेत ‘हजेरी’ लावली. इतरवेळी फोन न घेणारे, नागरिकांच्या तक्रारी ऐकाव्या लागतील म्हणून खुर्चीत न बसणारे काहीजण अचानक नगरपालिकेत ‘उगवले’. पदाधिकार्‍यांच्या दालनात भावनिक असा निरोप सोहळा पार पडला.

काही नगरसेवकांनी पाच वर्षे प्रशासनातील काही कर्मचार्‍यांना टार्गेट केले होते. मात्र, मतभेद बाजूला ठेवून आंबा बर्फीची देवाणघेवाण करत शेवटचा दिवस गोड केला.बुके, पुष्पगुच्छ देवून गळा भेट घेतली. फोटोसेशनही केले. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर प्रशासनाची, सर्वसामान्य कर्मचार्‍यांची नगरसेवकांनी आवर्जून दखल घेतली. मुदत संपल्यानंतर प्रशासक येणार आणि याच कर्मचार्‍यांची आता आपल्याला गरज भासणार हा हेतू ठेवून काही नगरसेवक वागत होते. त्यांचा हा कृत्रिमपणा कर्मचार्‍यांनीही ओळखला.

सातारा नगरपालिका www.pudhari.news

काही नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला सोबत घेवून चांगल्या पध्दतीने काम केले. नगरपालिकेत काम करताना प्रशासनाला येणार्‍या अडचणी ओळखून पदाधिकारी, नगरसेवकांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना समजावूनही घेतले. मात्र, ज्यांनी प्रशासनाला जाणीवपूर्वक टार्गेट केले, त्यांनी थोडी धास्ती घेतल्याचेही चित्र नगरपालिकेत पहायला मिळाले. मुदत संपण्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा पालिकेत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. नगर पालिकेतील सदस्यांची मुदत संपल्याने नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांच्या अधिकारावर मर्यादा आल्या आहेत. नगरसेवक पद असले तरी त्यांना पूर्वीसारखा आपल्या अधिकाराचा वापर करता येईल का, याची चर्चा सध्या नगरसेवकांमध्ये सुरु आहे.

प्रशासकीय राजवट

नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. निवडणूक कधी लागेल आणि नवी बॉडी कधी अस्तित्वात येईल हे तूर्त कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात नगरसेवकांना येणार्‍या प्रशासकासोबत जुळवून घ्यावे लागणार आहे. मनमानी करणारे, आडमुठी भूमिका घेणार्‍यांसाठी हा काळ कठिण असून उट्टे निघण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काही बदल होवू शकतात. शहरातील पायाभूत सुविधा, नागरिकांचे प्रश्‍न नगरसेवकांविना तडीस लावण्याचे दिव्य प्रशासकाला पार पाडावे लागणार आहे. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने कामकाज सुरळीत पार पाडवे लागणार आहे.

सध्या सातार्‍यातील राजकीय वातावरण ‘हॉट’ आहे. त्यातच मुदत संपल्याने यापुढील सर्व जबाबदारी प्रशासकाची राहणार आहे. आंदोलने, मोर्चे, तक्रारी यांसारखे इतर विषय प्रशासनाला कौशल्याने हाताळावे लागणार आहेत. सातारा नगरपालिकेत कोण प्रशासक येणार याचीही उत्सुकता नगरसेवकांसोबत कर्मचार्‍यांनाही लागली आहे.

Back to top button