पेट्रोलवर चालणारी आली हवेत उडणारी बाईक | पुढारी

पेट्रोलवर चालणारी आली हवेत उडणारी बाईक

जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने ‘एक्स टुरिस्मो’ नावाची हवेत उडणारी बाईक बनवली आहे. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली, तरी 2025 पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणायचं आहे. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमध्ये ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी ‘एक्स टुरिस्मो’सारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील, असं या कंपनीला वाटते.

बालपणात काही खेळ अगदी आपल्या हक्काचे असतात. आजूबाजूच्या सवंगड्यांना गोळा करून कागदाच्या होड्या बनवणं, खेळण्यातल्या गाड्या घेऊन त्यांची स्पर्धा भरवणं, विमानं बनवून ती हवेत उडवणं, त्याची मजा घेणं आपल्यासाठी फार कुतूहलाचं असतं. रिमोटच्या गाड्या चालवणं ही त्यातलीच इंटरेस्टिंग गोष्ट. टी.व्ही.वरच्या स्पोर्टस् चॅनेलवर लागलेल्या सायकल, गाड्या, बाईकच्या स्पर्धा आपल्यासाठी कुतूहलाचा विषय असतो. गाड्या, बाईकचे आवाज, स्पर्धकांमधली टशन, स्पर्धेतली आडवळणं पार करताना प्रसंगी गाड्या, बाईकचं वाढणारं स्पीड हे सगळं, काही क्षण हृदयाचे ठोके वाढवणारं असतं.

टी.व्ही.वरच्या गाड्या किंवा बाईक आपल्याला रोज आजूबाजूला दिसायला लागल्या आणि त्यातही त्या हवेत उडणार्‍या असल्या तर? किती भारी असेल ना? हे आता केवळ स्वप्नरंजन ठरणार नाहीय. कारण, जपानच्या एका कंपनीनं थेट हवेत उडणारी एक बाईक आणली आहे.
एलएलआय टेक्नॉलॉजी ही ड्रोन बनवणारी जपानमधली कंपनी आहे. या कंपनीने हवेत उडणारी बाईक बनवली आहे. तिचं नाव ‘एक्स टुरिस्मो लिमिटेड एडिशन’ असं आहे.

ही बाईक प्रतितास 100 किलोमीटर या वेगाने 40 मिनिटांपर्यंत उडू शकेल, असं कंपनीचे सीईओ डेसुके कातानो यांनी बाईक लाँच करताना म्हटलं होतं. 2017 पासून या बाईकवर काम सुरू झालं होतं. तर 26 ऑक्टोबर 2021 पासून या बाईकचं बुकिंगही सुरू झालंय. ऑक्टोबरमध्येेच या बाईकचा उडणारा एक व्हिडीओ आला आणि तो बघता बघता व्हायरलही झाला. तेव्हापासून या बाईकची उत्सुकता लागलेली होती. त्याआधी ही बाईक टोकियो इथल्या एका प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

सध्या तरी ही बाईक पेट्रोलवर चालते; पण 2025 पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणायचंय. रॉयटर न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, या बाईकचं वजन 300 किलो इतकं आहे. तर लांबी 3.7 मीटर, रुंदी 2.4 मीटर, उंची 1.5 मीटर इतकी आहे. बाईकची किंमत 5.10 कोटी असून, सध्या तरी कंपनीकडून केवळ 200 बाईक बाजारात आणल्या गेल्यात.

या बाईकला जपानच्या रस्त्यांवर उडवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तूर्तास तरी ती रस्त्यांवर उडताना दिसणार नाही, असं कंपनीचे सीईओ डेसुके कातानो यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काही काळ त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल; पण आपत्कालीन घटनांच्या काळात मात्र रेस्क्यू ऑपरेशन करताना या बाईकचा वापर करता येणं शक्य आहे.

रोजच्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण तसंच पेट्रोल, डिझेलवरचं अवलंबित्व वाढलं आहे. त्याचा एकूण पर्यावरणावर परिणाम होतो आहे. गाड्यांची वर्दळ वाढल्यामुळे रस्त्यांवरचं ट्रॅफिक वाढतं आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून पर्यायी मॉडेल उभं करायला हवं. त्याचाच एक भाग म्हणून याकडे आपण पाहत असल्याचं कातानो यांनी सांगितलंय.

ही बाईक बनवण्यासाठी एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीला मोठ्या प्रमाणात खर्चही आला आहे. त्यासाठी मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन, क्योसेरा या जपानी कंपन्यांसोबत कॅलिफोर्नियाची एरोस्पेस कंपनी जॉबी एव्हिएशन, इस्रायलच्या एअर या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला आहे.

याआधी 2018 मध्ये अमेरिकन कंपनी असलेल्या होवरसर्फ इंकनं ‘स्कॉर्पियन 3 होवर’ नावाची हवेत उडणारी बाईक बनवली होती. तिचं वजन 115 किलो इतकं, तर किंमत 39 लाख इतकी होती. त्यात 3 बॅटरी लावलेल्या होत्या. तिला चार्ज व्हायला 3 तास लागतील, असं म्हटलं जात होतं; पण त्यावर पुढे काही झालं नाही.

आपण खेळण्यांमधल्या रिमोट कारबद्दल ऐकलं असेल; पण याचवर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये एका इलेक्ट्रिक कारचं उड्डाण झालं. वाहननिर्मिती क्षेत्रातले उद्योगपती मॅथ्यू पिअर्सन यांनी ती लाँच केली. रिमोटचा वापर करून हवेत उडू शकणारी ही कार खास रेसिंगसाठी बनवण्यात आली आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्यात एअरक्राफ्ट नावाच्या कंपनीनेही अशाच एका गाडीची चाचणी घेतली होती. त्यासाठी अमेरिकन सैन्याची मदत घेतली गेली. ‘एअर कार व्ही 5’ नावाच्या एका दोन सीट असलेल्या कारची चाचणीही अशाच प्रकारे घेण्यात आली होती. त्याचं यशस्वीरीत्या लँडिंग आणि टेकऑफही घेण्यात आलं होतं.

सीमा बिडकर

Back to top button