शशिकांत शिंदेेंच्या अटकेच्या मेसेजवरून गरमागरमी

शशिकांत शिंदेेंच्या अटकेच्या मेसेजवरून गरमागरमी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यावर नोटीस बजावण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक रवाना झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातार्‍यात एकच गोंधळ उडाला. राजकीय गरमागरमीही झाली. यासंदर्भात जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांना विचारले असता असे कोणतेही पथक अद्याप तरी आले नसल्याची माहिती त्यांनी दिली.

आ. शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असून त्यांच्यात व भाजपचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध कोरेगावचे आ. महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याप्रकरणी दोन पत्रकार परिषदा घेऊन लोकसभेचे वातावरण गरमागरम केले
आहे. यातूनच आ. शशिकांत शिंदे यांच्या विरुध्द खा. उदयनराजे भोसले यांनी प्रचारसभेत भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करुन राळ उडवून दिली आहे. या घोटाळ्याबाबत आ. शशिकांत शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेवून त्यांची भूमिका मांडली आहे. गुरुवारी याच प्रकरणावरुन सोशल मीडियावर बातम्या पसरल्या.

'राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांना नव्या गुन्ह्यात कारवाई करण्यासाठी 41 ची नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक सातार्‍याच्या दिशेने रवाना. सातार्‍यात पोहोचल्यावर हे पथक जिल्हा पोलिस प्रमुख यांची भेट घेईल,' असा मजकूर व्हायरल होत होता. यामध्ये पोलिस अधीक्षक यांचा उल्लेख आल्याने त्याबाबत एसपी समीर शेख यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले 'अद्याप असे पथक आलेले नाही. ते आले तर आपल्याला समजेल,' अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news