Satara News | ३०० महिलांनी एकमेकींना हातवारे करत वाहिली शिव्यांची लाखोली; काय आहे ही बोरीच्या बाराची परंपरा? | पुढारी

Satara News | ३०० महिलांनी एकमेकींना हातवारे करत वाहिली शिव्यांची लाखोली; काय आहे ही बोरीच्या बाराची परंपरा?

लोणंद; शशिकांत जाधव : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावात मंगळवारी सुमारे ३०० महिलांनी एकमेकींना वाजत-गाजत शिव्यांची लाखोली वाहिली. पाऊण तास दोन्ही गावातील महिलांनी डफडे, ताशा, शिंग या वाद्यांच्या निनादात एकमेकींना शिव्या घालून, बोरीच्या बाराची परंपरा कायम ठेवली. यावेळी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती. (Satara News)

सुखेड व बोरी या गावातील महिला अनेक वर्षांपासून नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावाच्या दरम्यान जाणार्‍या ओढ्याच्या काठाला येऊन शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालतात. यावर्षी बोरीचा बार कसा होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. दुपारी १२ च्या सुमारास प्रथमत: सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग या वाद्यांसह ओढयाच्या तीरावर येऊन हातवारे व टाळ्या वाजवत बार घालू लागल्या. त्यावेळीच बोरी गावातील काही उपस्थित महिलांनीही हातवारे करत बार घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर बोरी गावातील महिला वाजत गाजत येऊन बोरीचा बार घालू लागल्या.

दोन्ही बाजुच्या माहिलांनी एकमेकांना हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. ओढ्यामध्ये धोम-बलकवडीचे पाणी सोडण्यात आले होते. बार घालणार्‍या महिलांबरोबरोबरच बघ्यांना आवरताना पोलीस, ग्रामस्थ यांची मोठी धांदल उडत होती. बार घालणार्‍या महिला हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत होत्या. यावेळी डफडे, शिंग, तुतारीचा आवाज जसा वाढत जाईल तसा महिलांचा उत्साह वाढून टाळ्या वाजवून त्या एकमेंकींना आव्हान देत होत्या. त्यातच बघ्यांची गर्दी ही महिलांना चिथावणी देत होती. बोरीच्या बारात आबालवृद्धांसह सुमारे ३०० च्यावर महिला सहभागी झाल्या होत्या. सुमारे पाऊण तास पाण्यात उभे राहून बोरीचा बार घालणार्‍या महिलांना मागे ढकलत नेऊन ग्रामस्थ व पोलिस बार कमी वेळ होण्याचा प्रयत्न करत होते. (Satara News)

हेही वाचा : 

Back to top button