सातारा : दोन टोळ्या तडीपार | पुढारी

सातारा : दोन टोळ्या तडीपार

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यात मारामारी करणे, गंभीर दुखापत करणे आणि कोयत्याचा धाक दाखवणे असे गुन्हे करणार्‍या दोन टोळ्यांना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दणका देत जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. यामध्ये पाच संशयितांचा समावेश असून, ते कोरेगाव तालुक्यातील आहेत.

अथर्व अजय पवार (वय 19, रा. कोरेगाव), तौफिक शब्बीर शेख (वय 20), निरज तानाजी बोडरे ऊर्फ फक्की (वय 19, दोघेही रा. केदारेश्वर रोड, ता. कोरेगाव) अशी संशयित तिघांची नावे आहेत. या टोळीने सातारा जिल्हयामध्ये गर्दी मारामारी करून दुखापत करणे, कोयत्या सारखे घातक शस्त्रे बाळगून दुखापत करणे असे गैरप्रकार केले आहेत. यामुळे कोरेगाव पोलिसांनी संशयितांचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवला.

तसेच दुसरी टोळीही कोरेगाव तालुक्यातील आहे. युवराज भरत जगदाळे (वय 22), अथर्व सुशांत जगदाळे (वय 21, दोघे रा. कुमठे ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी सातारा जिल्ह्यामध्ये रस्ता अडवून दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, गर्दी मारामारी करुन जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हे संशयितांवर दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र संशयितांमध्ये सुधारणा होत नव्हती. उलट त्यांची दिवसेंदिवस दहशत वाढून सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत होता.

यामुळे कोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि एस. आर. बिराजदार यांनी दोन्ही टोळ्यांविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवला. यावेळी हद्दपार प्राधिकरणासमोर सुनावणी होवून तडीपार करण्याचे आदेश करण्यात आले. संशयितांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून उपद्रवी टोळयांमधील 24 जणांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाई करण्यात येणार आहेत.

Back to top button