पुढील महिन्यात दुर्बिणीशिवायच दिसणार धूमकेतू! | पुढारी

पुढील महिन्यात दुर्बिणीशिवायच दिसणार धूमकेतू!

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी एका नव्या धूमकेतूचा शोध लावला आहे. हा धूमकेतू कदाचित आपल्या सौरमालिकेबाहेरून आलेला असावा, असे त्यांना वाटते. हा धूमकेतू आपल्या सौरमालिकेला सोडण्यापूर्वी पृथ्वीच्या भेटीला येणार आहे. तो पुढील महिन्यात दुर्बिणीशिवायही, उघड्या डोळ्यांनी पाहता येऊ शकेल! या धूमकेतूचे नाव ‘निशिमुरा’ असे आहे. तो 13 सप्टेंबरला पृथ्वीजवळून जाईल.

हा बर्फाळ धूमकेतू पृथ्वीजवळून जात असताना शंभर पट अधिक तेजस्वी म्हणजेच रात्रीच्या आकाशात एखाद्या तार्‍यासारखा प्रकाशमान दिसेल. जपानमधील हौशी खगोलशास्त्रज्ञ हिदियो निशिमुरा यांनी या धूमकेतूचा शोध घेतला असून, त्याला ‘सी/2023 पी1’ अशी ओळख दिली आहे. 12 ऑगस्टला तो आपल्या सौरमालिकेच्या मध्यावर होता. ‘निशिमुरा’ असे निकनेम असलेल्या या धूमकेतूवर त्यानंतर सतत लक्ष ठेवण्यात आले. त्याच्या ‘हायपरबोलिक’ कक्षेवरून तो आपल्या सौरमालिकेच्या बाहेरून आला असावा, असे संशोधकांना वाटते.

कदाचित, या धूमकेतूची ही आपल्या सौरमालिकेतील पहिली आणि शेवटची ‘ट्रीप’ असावी. यापूर्वी ‘ओमुआमुआ’ हा खगोल आणि ‘2एल/बोरीसोव्ह’ या धूमकेतूने असाच सौरमालिकेच्या बाहेरून येऊन आपल्या सौरमालिकेचा प्रवास केला होता. कदाचित, हा नवा धूमकेतू आपल्या सौरमालिकेजवळ असलेल्या ‘उर्ट क्लाऊड’ मध्ये जन्मलेला असावा. या ढगांमध्ये धूमकेतू व तत्सम बर्फाळ खगोल मोठ्या संख्येने आहेत. हा धूमकेतू 13 सप्टेंबरला पृथ्वीजवळून जाईल. तो 18 सप्टेंबरला सूर्याच्या अधिक जवळ असेल. 13 सप्टेंबरला तो रात्रीच्या आकाशात 5 ते 3 मॅग्निट्यूडमध्ये प्रकाशमान दिसेल. एखादा तारा जसा रात्रीच्या आकाशात तेजस्वी दिसतो तसाच हा धूमकेतूही दिसून येईल.

Back to top button