छत्रपती शिवरायांच्या मूळ कागदपत्रांचा ठेवा होणार खुला | पुढारी

छत्रपती शिवरायांच्या मूळ कागदपत्रांचा ठेवा होणार खुला

अनिल देशमुख

कोल्हापूर : युगपुरुष छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य पराक्रम आणि अलौकिक कर्तृत्वाची पदोपदी साक्ष देणारे गडकोट-किल्ले आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग आजही प्रेरणादायी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास उलगडणारे अनेक दस्तऐवजही मूळ कागदपत्रांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. हाच अमूल्य ठेवा आता इतिहास संशोधक, अभ्यासक तसेच सर्वसामान्य जनतेसाठी खुला होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची निवडक दुर्मीळ पत्रे, आदेश पुस्तकाच्या स्वरूपात (कॉफी टेबल बुक) प्रकाशित केले जाणार आहेत. शिवाय, डिजिटल बुकही राज्य शासनाकडून प्रकाशित केले जाणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा यानिमित्ताने राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्याच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने निवडक आणि महत्त्वाची कागदपत्रे, पत्रे पुस्तक स्वरूपात समोर आणली जाणार आहेत. याबाबत सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, याकरिता लागणार्‍या खर्चालाही राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

छत्रपती शिवरायांची राजनीती, युद्धनीती, प्रशासननीती, रयतेविषयी असलेला कळवळा, त्यातून घेतलेले निर्णय आजही देशभरातच नव्हे, तर जगभरातील राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरावेत असेच आहेत. छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र आणि संपूर्ण इतिहास समोर उभी करणारी अनेक कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. मात्र, ती सर्वसामान्यांना सहजपणे पाहता येत नाहीत, ती आता या कॉफी टेबल बुक आणि डिजिटल बुकद्वारे सर्वसामान्य नागरिकांनाही पाहता येणार आहेत.

शिवरायांची 250 हून अधिक पत्रे उपलब्ध

राज्यासह संपूर्ण देशभरात खासगी व्यक्ती, संस्था तसेच राज्य शासनाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील पुराभिलेखागार विभागाकडे छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीतील आणि तत्कालीन शिक्के, स्वाक्षरीसह मूळ स्वरूपातील सुमारे 250 हून अधिक पत्रे उपलब्ध आहेत. यापैकी काही पत्रे वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांतून प्रकाशितही झाली आहेत. ही सर्व पत्रे संकलित करून त्यातील निवडक आणि दुर्मीळ पत्रे एकत्रित केली जातील आणि ती पुस्तक स्वरूपात प्रकाशित केली जातील.

Back to top button