इस्लामपुरात बुधवारी राडा; गुरुवारी सभा खेळीमेळीत | पुढारी

इस्लामपुरात बुधवारी राडा; गुरुवारी सभा खेळीमेळीत

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा :  बुधवारी नगरपालिकेत झालेल्या राड्यानंतर गुरुवारी पालिकेची तहकूब विशेष सभा दिवसभर खेळीमेळीत पार पडली. या सभेत शहरातील विविध विकासकामांच्या 66 विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, बुधवारच्या राड्याप्रकरणी विकास आघाडीच्या निषेधाचा राष्ट्रवादीने दिलेला प्रस्ताव पिठासीन अधिकार्‍यांनी फेटाळून लावला.

शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यासाठी मार्च महिन्यात बोलविण्यात आलेली व वारंवार तहकूब झालेली विशेष सभा गुरुवारी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत पार पडली. सभा चालू होण्याअगोदरच पालिका परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र सभा खेळीमेळीत पार पडली.

या सभेत विकास कामांच्याबरोबरच शहरात हुतात्मा स्तंभ उभारण्यास प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठानला जागा उपलब्ध करून देणे, उरुण परिसरातील रुग्णालयास बाबा भारती यांचे नाव देणे, अवैध मोबाईल टॉवरवर कारवाई करणे आदी ठराव मंजूर करण्यात आले होते.

गोंधळ घालणार्‍या विकास आघाडी व शिवसेनेच्या नगसेवकांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. सभा संपल्यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी असा प्रस्ताव सभेच्या किमान 10 दिवस आधी देण्यात यावा, अशी कायद्यात तरतूद असल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

इस्लामपुरात नगरपालिका

Back to top button