सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी, अवकाळी अशा संकटांना तोंड देत शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकविलेला ११२३ किलो कांदा विकून ( onion price ) त्याच्या पदरात केवळ १३ रूपये शिल्लक राहिले. यामुळे व्यथित झालेले शेतकरी बापू कवडे यांनी सोशल मीडियावर आपली कांदा विक्रीची पावती व्हायरल करून व्यथा मांडली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी बापू कवडे या शेतकऱ्याने आपला २४ पिशवी कांदा ( onion price ) विक्रीसाठी आणला होता. हा कांदा या शेतकऱ्याने रूद्रेश पाटील या अडत दुकानदाराकडे विक्री केला. कवडे यांच्या कांद्याची प्रतवारी करण्यात आली. त्यातील काही किलो कांद्याला १००,१५०,२०० रूपये असा प्रति क्विंटलला दर देण्यात आला. त्याचे एकूण १६६५ रूपये झाले. त्यातून हमाली, तोलाई व गाडीभाडे असे १६५१ रूपये खर्च झाले. त्यामुळे शेतकरी कवडे यांच्या हातात फक्त १३ रूपये शिल्लक राहिले. त्यामुळे व्यथित होऊन शेतकऱ्याने आपली कांदा विक्रीची पावती सोशल मीडियवर व्हायरल केली.
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशात प्रचंड पाऊस आहे. त्यामुळे तेथील कांदा ( onion price ) खरेदीदार व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली आहे, त्यामुळे दर कोसळल्याचे बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वीही काढणीला आलेला कांदा ( onion price ) अतिवृष्टीमुळे वाया गेला होता. शेतात पाणी लागून राहिल्याने. कांदा जमिनीतच कुजून गेला होता. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा लागवड करून कांदा पिकविला आहे. आता पुन्हा कांदा काढणीच्या वेळीच अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ओला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला तर तो कवडीमोल दराने खरेदी केला जात असल्याने शेतकरी आणखीन आर्थिकदृष्ट्या खचला आहे.
दरम्यान माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बापू कवडे या शेतकऱ्याची कांदा पावती ट्विट करून केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारचे आता १३ वे घालावे का असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.