

मुंबई : पुढारी ऑनलाईन
मिर्झापूर (Mirzapur) या वेबसीरिजमध्ये मुन्ना भैय्याच्या खास मित्राची भूमिका साकारणाऱ्या ब्रह्मा मिश्रा (Brahma Mishra) या अभिनेत्याचे निधन झाले आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर ब्रह्माला २९ नोव्हेंबर रोजी घरी पाठवण्यात आले, मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. वेदनादायक बाब म्हणजे त्यांचा मृतदेह तीन दिवस मुंबईच्या यारी रोड वर्सोवा येथील घराच्या बाथरूममध्ये पडून होता. मुंबई पोलिसांना याबाबत माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यामुळे मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण नंतर कळू शकेल.
मिर्झापूर सारख्या सर्वोत्कृष्ट वेबसिरीजमध्ये त्याने (Brahma Mishra) ललित नावीचे पात्र साकारले. जो मुन्ना भैयाचा (दिव्येंदू शर्मा) खास मित्र असतो. ब्रह्माच्या मृत्यू झाल्याचे समजताच अभिनेता दिव्येंदू शर्माने इंस्टाग्रामवर ललितचा फोटो शेअर करून ही दुःखद बातमी दिली आहे. ललितच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणाऱ्या ब्रह्माचे इतक्या लहान वयात जाणे सर्वांनाच हादरवून सोडणारे आहे. तो आता या जगात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.
ब्रह्मा मिश्राने (Brahma Mishra) अनेक चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. पण त्याला मिर्झापूर १ आणि २ या वेब सीरिजने प्रसिद्धी मिळवून दिली. या वेब सीरिजमधील त्याच्या ललित नावाच्या भूमिकेचे कौतुक सर्वांनीच केले. एवढेच नाही तर त्याने ललितचे पात्र त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट आणि हिट पात्र असल्याचे सांगितले. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, ही त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका होती. मिर्झापूर वेब सीरिजनंतर ब्रह्माचे अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
३२ वर्षीय ब्रह्मा मिश्रा (Brahma Mishra) हा मूळचा भोपाळच्या रायसेन येथील होता. रायसेनमध्येच त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्याचे वडील बँकेत कामाला होते. मिर्झापूरशिवाय ब्रह्माने केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ब्रह्माने २०१३ मध्ये 'चोर चोर सुपर चोर' या चित्रपटातून पदार्पण केले होते. २०२१ मध्य आलेला 'हसीन दिलरुबा' हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ३० नोव्हेंबरला ब्रह्माचा ३२ वा वाढदिवस होता. ५ दिवसांपूर्वी ब्रह्माने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्याने लिहिले आहे की, केवळ आसक्तीचा नाश करणे यालाच मोक्ष म्हणतात. ब्रह्माने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही, परंतु हा त्याच्या भोपाळच्या घराबाहेर क्लिक केलेला फोटो असा अंदाज आहे.