Sangli News: प्रसंगी बाहेरून वीज खरेदी करू, पण दुष्काळी भागातील शेती, उद्योगांसाठी कोयनेतून पाणी सोडू: शंभूराज देसाईंची मोठी घोषणा | पुढारी

Sangli News: प्रसंगी बाहेरून वीज खरेदी करू, पण दुष्काळी भागातील शेती, उद्योगांसाठी कोयनेतून पाणी सोडू: शंभूराज देसाईंची मोठी घोषणा

विजय लाळे

विटा : अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कोयना धरणातील २ टीएमसी पाणी तात्काळ कृष्णा नदीत सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच आम्हाला भूमिका घेताना राजकीय नव्हे, तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून घ्याव्या लागतात, प्रसंगी बाहेरून वीज खरेदी करून वीज निर्मितीसाठी लागणारे पाणी कमी करून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी सोडण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ, असेही ना. देसाई यांनी सांगितले. (Sangli News)

मुख्यमंत्र्यांच्या कथित आदेशानंतरही कृष्णा कोरडीच ! या शिर्षकाच्या ‘दैनिक पुढारी’त बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडल्या. यात आमदार अनिल बाबर यांनी राजस्थान येथे प्रचारात मग्न असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभराज देसाई यांना फोनवरूनच काही सूचना दिल्या. तसेच उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाबरोबरच ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विजेसाठी लागणारे पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी सोडण्याबाबत धोरणात्मक बाबी तपासून पहाव्यात, असे निर्देशही दिले. (Sangli News)

याबाबत माहिती देताना शंभूराज देसाई म्हणाले की, आज शुक्रवारी दुपारी ऊर्जा विभाग आणि जलसंपदा विभाग त्यांची बैठक होणार आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने अभूतपूर्व पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कृष्णा नदीतून पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ही नदी कोरडी पडत आहे. कमी पाऊस झाल्याने यावर्षी कोयना धरण क्षमतेपेक्षा आणि नेहमीपेक्षा सत्तावीस ते तीस टक्के कमी भरलेले आहे. पाणी जपून काटकसरीने वापरले पाहिजे. तरच ते वर्षभर पुरेल. गेल्या दोन-तीन दिवसांत सातारचे पालकमंत्री आडमुठेपणाची भूमिका घेतात, त्यांचा राजीनामा घ्या, वगैरे वगैरे बातम्या वाचतोय, परंतु आम्हाला भूमिका घेताना राजकीय नव्हे, तर सगळ्याचा विचार करून सरकारचा प्रतिनिधी म्हणून घ्याव्या लागतात.

यावर्षी कोयनेमध्ये वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेले राखीव पाणी सुद्धा पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि उद्योगांना देण्याबाबत धोरणात्मक विचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घ्या, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याला सांगितले आहे, असे सांगून आजपासून (दि.२४) तात्काळ २ टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्याचे आदेश आपण जलसंपदा विभागाला दिले आहेत. शिवाय वीज, शेती आणि उद्योगांसाठी पाणी देता येईल का ? याबाबत ऊर्जा विभाग आणि जलसंपदा विभागाची स्वतंत्र बैठक आजच दुपारी बोलावली आहे. विजेसाठीचे राखीव पाणी सोडल्याने जेवढी कमी होईल तेवढी वीज आपण बाहेरून खरेदी करण्याबाबत प्रयत्न करू, त्यासाठी जो निधी लागेल, तो उपलब्ध करण्याचे प्रस्ताव आम्ही तयार करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत पिण्यासाठी आणि शेती- उद्योगांसाठी पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असेही देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button