सातारा : सांगलीच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश | पुढारी

सातारा : सांगलीच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पाण्यासाठी तहानला असताना महावितरण कार्यालयाकडून उफराटा कारभार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा सर्व्हे न करता टेलपर्यंत धोम डाव्या कालव्याचे पाणी पोहचत नसल्याचे कारण देत कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील अपशिंगे, अंभेरी, साप, वेळू, बेलेवाडी या गावांमधील विद्युत मोटारींचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी रहिमतपूर पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. यामुळे सांगलीच्या
पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सांगली जिल्ह्याला कोयना धरण आणि धोम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. सर्व धरणे व पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील असताना जिल्ह्यातीलच शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. सांगलीला पाणी पोहचत नाही, असे कारण देत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून उफराटा कारभार करण्यात आला आहे. धोम डाव्या कालव्याचे पाणी टेलपर्यंत पोहचत नाही, असे थातूरमातूर कारण सांगून कोरेगाव तालुक्यातील चार गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिले आहेत. याची कार्यवाही करण्याची जबाबदारी रहिमतपूरच्या पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपवण्यात आली आहे. दि. 20 नोव्हेंबर ते दि. 3 डिसेंबर या 13 दिवसांच्या कालावधीत अपशिंगे, अंभेरी, साप, वेळू, बेलेवाडी या गावातील विद्युत मोटारींच्या वीज तोडा, असे फर्मानच काढण्यात आले आहे. सांगलीला पाणी पोहचले का नाही? अतिरिक्त पाणी उपसा होतो की नाही? हे न पाहताच हा तुघलकी कारभार केला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी अशा प्रकारचा आदेश दिला असता ते मान्य करता आले असते. परंतु, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना हे अधिकार कोणी दिले? धरण व पुनर्वसन सातार्‍यात तर पाणी सांगलीला देवून लाईट सातार्‍याची का तोडता? सांगलीला पाणी पोहचत नाही म्हणणार्‍या अधिकार्‍यांनी पाणी टेलपर्यंत जाते की नाही याचा सर्व्हे केला का? असे सवाल शेतकरी संघटनांकडून उपस्थित केले जात आहेत.

Back to top button