T20 World Cup 2024 : ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा? हार्दिकबाबत सस्पेन्स कायम | पुढारी

T20 World Cup 2024 : 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा? हार्दिकबाबत सस्पेन्स कायम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष जूनमध्ये होणार्‍या T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेकडे वेधले आहे. वृत्तसंस्‍था ‘पीटीआय’ने दिलेल्‍या माहितीनुसार, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे शनिवार, २७ एप्रिल रोजी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना पाहण्‍यासाठी स्‍पेनहून दिल्‍लीला आले होते. आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांची दिल्लीत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य १५ सदस्यीय संघाबाबत अनौपचारिक बैठक होण्याची अपेक्षा आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १ मे आहे.

भारतीय संघाची घोषणा १ मेला होण्‍याची शक्‍यता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्‍यानंतर आगरकर आणि रोहित शर्मा यांची भेट झाली. भारतीय संघाची घोषणा 1 मे रोजी केली जाऊ शकते. संघ निवडीसाठीच्‍या मुदतीचा हा अंतिम दिवस आहे. संघाची घोषणा होण्यापूर्वीच आगरकर आणि रोहित यांच्यात सोमवार २९ एप्रिल रोजी बैठक होण्‍याची शक्‍यता आहे. मुंबईचा पुढील सामना लखनौविरुद्ध ३० एप्रिल रोजी एकना स्टेडियमवर होणार आहे.

हार्दिकच्‍या निवडीबाबत सस्पेन्स कायम

यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये टीम इंडियाचा अष्‍टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची कामगिरी अत्‍यंत निराशाजनक झाली आहे. त्‍याचबरोबर त्‍याच्‍या फिटनेसविषयीही चर्चा होत आहे. हार्दिकने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 36 षटकांऐवजी केवळ 19 षटके टाकली आहेत. त्याचवेळी, फिनिशर म्हणून त्याला इतक्या सामन्यांमध्ये केवळ 10 षटकार मारता आले आहेत. यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये त्याने नऊ डावांमध्ये 142 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या आहेत. . मात्र यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये शिवम दुबे हा हार्दीकपेक्षा खूप पुढे आहे. सीएसकेच्या या फलंदाजाने आठ सामन्यांत 22 षटकार ठोकले आहेत.

चहलपेक्षा अक्षरला प्राधान्‍य मिळण्‍याची शक्‍यता

वेगवान गोलंदाजी आणि फिरकीपटूंबाबतही गोष्टी स्पष्ट नाहीत. जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्मात आहे, तर अनुभवी मोहम्मद सिराजची आयपीएलमध्ये कामगिरी चांगली राहिलेली नाही. अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल यांच्यात संघाच्या तिसऱ्या फिरकीपटूसाठी स्पर्धा होणार आहे. उत्तम फलंदाजी कौशल्यामुळे अक्षरचा दावा अधिक भक्कम आहे.

पंतचे टीम इंडियात कमबॅक होणार? सॅमसन की केएल राहुल?

यष्टिरक्षकासाठी ऋषभ पंतसह संजू सॅमसन आणि लोकेश राहुल यांच्या नावावर साशंकता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या ( ‘बीसीसीआय’) सूत्राने सांगितले की, ‘चांगली कामगिरी असूनही संजू सॅमसनच्या निवडीबाबत शंका कायम आहे. ऋषभ पंतची निवड निश्चित आहे, तर दुसरा यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलचा समावेश केला जाऊ शकतो. यंदाच्‍या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत लखनऊचा कर्णधार राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने आणि 144.27 च्या स्ट्राईक रेटने 378 धावा केल्या आहेत. शिवम दुबेचीही निवड होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पंत यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कार अपघातानंतर पुनरागमन करत त्याने पहिल्याच स्पर्धेत बॅटने अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने 10 सामन्यात 46.38 च्या सरासरीने आणि 160.60 च्या स्ट्राईक रेटने 371 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सध्या चौथ्या स्थानावर आहे.

 पॉवर हिटिंगने शिवम दुबेने सर्वांचे लक्ष वेधले

शिवम दुबेच्या पॉवर हिटिंगने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत त्याने आठ सामन्यांमध्ये 51.83 च्या सरासरीने आणि 169.94 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 311 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 66 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. दुबे चेन्‍नई सुपरकिंग्‍जकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऋतुराज गायकवाड अव्वल क्रमांक आहे. त्याने सीएसकेसाठी आतापर्यंत आठ सामन्यांत ५८.१७ च्या सरासरीने ३४९ धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.

टी-२० विश्वचषकाचा थरार जूनमध्ये रंगणार

ICC T20 विश्वचषक 2024 या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात सह-यजमानपदावर खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्‍पर्धेतील सर्वात लक्षवेधी सामना रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

Back to top button