Heatwave Alert : देशभरात उष्णतेची लाट! प. बंगालमध्ये रेड, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट | पुढारी

Heatwave Alert : देशभरात उष्णतेची लाट! प. बंगालमध्ये रेड, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरात वाढत्या उष्म्‍याने नागरिक हैराण झाले आहेत. देशातील अनेक भागात तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील अनेक दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचेही  हवामान विभागाने स्‍पष्‍ट केले आहे. (Heatwave Alert) पुढील तीन दिवसांत तापमानात हळूहळू एक ते दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊन पुढील दोन दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यांच्या हवामानाबद्दल अधिक जाणून घेऊया, (Heatwave Alert)

Heatwave Alert: बंगाल, ओडिशामध्ये रेड अलर्ट

हवामान खात्यानुसार, उष्ण आणि दमट हवामानामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये दिवसाचे कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. वाढत्या उष्णता आणि उष्णतेच्या लाटेबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय म्हणाले, ‘ओडिशातही उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती बिघडत आहे. अशीच परिस्थिती काही दिवस येथे राहणार आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशसाठी देखील अलर्ट

हवामान खात्याने पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. येथेही उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचे हाल होऊ शकतात, असेही हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्‍ये अवकाळी

जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूमध्ये रविवारी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD ने आज सकाळी मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा विदर्भ प्रदेश आणि उत्तर तेलंगणात पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने रविवारी अरुणाचल प्रदेश, आसाम, पूर्व मेघालय, नागालँड आणि मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Back to top button