सांगली : ऐतिहासिक राजेवाडी तलाव आटला; माणदेशावर पाणीबाणीचे संकट | पुढारी

सांगली : ऐतिहासिक राजेवाडी तलाव आटला; माणदेशावर पाणीबाणीचे संकट

दिघंची; पुढारी वृत्तसेवा : माणदेशाची तहान भागवण्यासाठी ब्रिटिशांच्या व्हिक्टोरिया राणीने 1879 मध्ये राजेवाडीचा तलाव बांधला. मात्र तलावातील पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त सोलापूर जिल्ह्याला होत आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याचे दुर्भीक्ष्य, तर दुसरीकडे बारमाही पीक अशी विचित्र स्थिती आहे. सध्या तरी हा तलाव कोरडा पडलेला आहे.

तलावात मृतसंचय पातळीच्या खाली पाणी गेले आहे. त्यामुळे चार हजार दोनशे आठ एकर क्षेत्रावर पाण्याचे संकट ठाकले आहे. आटपाडी तालुक्यातील 822 हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी सिंचनाखाली घेण्याचे राहिले आहे. राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाच्या 3556 फूट लांबीच्या सांडव्यावरून पाणी पडते. यामुळे तलावाखाली लिंगीवरे, दिघंची त्याखाली असणारे बंधारे भरले जातात.
तलावाचे पाणी समन्यायी पद्धतीने वाटावे अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. आटपाडी तालुक्यातील अनेक नेत्यांच्या उदासीन भूमिकेमुळे सातत्याने दोन-चार वर्षांनी तालुक्याला दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकावे लागते.

राजेवाडी तलावाला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. तलाव बांधल्यापासून पूर्ण क्षमतेने गाळ काढला गेला नाही, त्यामुळे तीन हजार सत्तर दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता व 480 चौरस मैल पाणलोट क्षेत्र असणार्‍या तलावात गाळामुळे आता पन्नास टक्के पाणीसाठा आहे. साठलेल्या गाळामुळे पाणी साठवण क्षमता 1493 दशलक्ष घनफुटापेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे कृष्णेचे पाणी या तलावात आणून सोडावे, वर्षातून दोन वेळा हा तलाव भरून द्यावा अशी मागणी होत आहे.

अनेक वर्षापासून रखडलेल्या राजेवाडी उजव्या कालव्याच्या पूर्ततेअभावी आटपाडी तालुक्याला 842 हेक्टर क्षेत्र 1977 पासून सिंचनाखाली येण्याचे राहिले आहे. विस्तारीकरणाच्या भिजत पडलेल्या घोंगड्यामुळे माण तालुक्यातील पळसावडे, आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, लिंगिवरे, पळसखेल आवळाई या गावचे किमान 1926 हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. सध्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. याअगोदर 1972 व 1993 तसेच 2003 व 2010 ते 2018 पर्यंत हा तलाव कोरडा होता. त्यानंतर सलग चार वर्षे पूर्ण क्षमतेने भरला होता, यातून या परिसराला दिलासा मिळाला होता.

आटपाडी तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी राजेवाडी तलावातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळणे गरजेचे आहे. दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी बारमाही माणगंगासारखी योजना राबवावी अशीही मागणी होत आहे. त्याचप्रमाणे राजेवाडी उजव्या कालव्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

Back to top button