मिरज : जागेच्या वादातून वृद्धाचा खून | पुढारी

मिरज : जागेच्या वादातून वृद्धाचा खून

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : मिरज-पंढरपूर रस्त्यावर जागेच्या वादातून छातीवर लाथ मारल्याने जयंतीलाल मूलजी ठक्कर (वय ८२) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. वृद्धाच्या खूनप्रकरणी राहुल मोहन मोरे (वय ४५) या निवृत्त पोलिस निरिक्षकाच्या पुत्रास पोलिसांनी अटक केली. याबाबत मयुर जयंतीलाल ठक्कर यांनी वडिलांच्या खूनाची फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर रस्त्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठक्कर यांच्या श्रीवल्लभ निवास या घरासमोर पडदे व गादी विक्रीचे दुकान आहे. राहुल मोरे हा त्यांचा शेजारी असून ठक्कर यांच्या गादी कारखान्याच्या शेडचा भाग राहूल याच्या प्लाॅटमध्ये आल्याचा राहूल याचा आक्षेप होता.

गुरुवारी सकाळी घरासमोरील दुकानात मयूर व वडील जयंतीलाल बसले असताना राहुल मोरे तेथे आला. त्याने “तुमच्या कारखान्याच्या शेडचा भाग माझे प्लॉटमध्ये येतो तो आजच्या आज काढून घ्या” असे ठक्कर यांना सांगितले. मयूर ठक्कर यांनी शासकीय मोजणी करुन घेऊन जर तुमच्या प्लॉटमध्ये शेडचा भाग येत असेल तर काढून घेतो असे सांगितले. त्यावेळी राहुल मोरे रागाने ठक्कर यांच्या दुकानात शिरला. त्यावेळी मयूर ठक्कर यांनी “तु दुकानातून बाहेर जा” असे म्हणाल्याने “मला जा म्हणणारे तुम्ही कोण” असे म्हणत रागाने शिवीगाळ करून मयूर यांना ढकलुन पाठीत लाथ मारून खाली पाडले.

तसेंच “तुम्ही शेडचा भाग काढला नाही तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही” असे धमकावले. यावेळी मयूर यांचे वडील जयंतीलाल यांनी मध्यस्ती करीत त्यास समजावण्याचा प्रयत्न केल्याने , “तुला आता जिवंत ठेवत नाही” असे म्हणत जयंतीलाल यांच्या छातीवर जोरात लाथ मारुन त्यांना खाली पाडले. छातीवर लाथ जोरदार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची तक्रार आहे.

याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करुन राहूल मोरे यास पोलिसांनी अटक केली. मिरज शहर पोलिस ठाण्याचे याबाबत नोंद करण्यात आली आहे.

 

Back to top button