शेतकर्‍यांचे पैसे वसूल करणार : राजू शेट्टी | पुढारी

शेतकर्‍यांचे पैसे वसूल करणार : राजू शेट्टी

वाळवा; पुढारी वृत्तसेवा : सारे साखर कारखानदार शेतकर्‍यांचे पैसे बुडविण्यासाठी एकत्र आले आहेत. 7 मे नंतर शेतकर्‍यांचे ठरलेले 180 कोटी त्यांच्या घशातून बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी वाळवा येथे बोलताना केले.

येथील हुतात्मा चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत विश्वासघाताने माझा पराभव केला. गेली 20 वर्षे एक नोट एक वोट देऊन मला प्रस्थापितांना विरोध करण्याचे सामान्य जनतेने बळ दिले. शेतकर्‍यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्यामुळे त्यांच्याशी मी कधीही गद्दारी करणार नाही.

मला मातोश्रीवर जायची हौस नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेटीला बोलावले होते, म्हणून गेलो. त्याठिकाणी इस्लामपूरहून एका नेत्याचा निरोप आला आणि मला मशाल चिन्हावर लढा म्हणून सांगितले. माझा पक्ष स्वतंत्र आहे मग मी कसा तयार होईन? यावेळी अ‍ॅड. एस. यु. संदे, पोपट मोरे, जगन्नाथ भोसले, भास्कर कदम, सूर्यभान जाधव, तानाजी देशमुख, आप्पासाहेब पाटील आदींची भाषणे झाली.

Back to top button