कोल्‍हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार : मंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

कोल्‍हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार : मंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहरास कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला आहे. शहराचा विकास करण्याचे ध्येय शिवसेनेने आखले असून, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यास पाठबळ मिळत आहे. त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार व्हावा या भावनेने शिवसेनेने नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्‍त आज ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांचा चांदीची तलवार व पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार केला. यावेळी हद्दवाढ, घरफाळा घोटाळा, गाळेधारकांचा प्रश्न आदी प्रमुख प्रश्न मार्गी लावण्याबाबत राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, नगरविकास विभागाकडून कोल्हापूर महानगरपालिकेस नगरोत्थान योजनेच्या रु.२३७ कोटी, मुलभूत सोयीसुविधेच्या रु.१५ कोटी आणि रंकाळा तलावास मंजूर रु.१५ कोटीच्या निधी मंजुरी बद्दल प्रथमतः कोल्हापूर शहरास मंजूर केलेल्या निधीबाबत आभार मांडले. कोल्हापूर महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न कमी असून, ते वाढविण्यासाठी हद्दवाढ महत्वाची आहे. यासह कोल्हापूर महानगरपालिकेच्या हक्काच्या उत्पन्नावर डल्ला मारणाऱ्या घरफाळा घोटाळ्याची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी. यासह महानगरपालिकेच्या गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा, या संदर्भात मंत्रालय स्तरावर बैठकींचे आयोजन करावे, अशा प्रमुख मागण्याही राजेश क्षीरसागर यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या.

यावेळी बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, नगरविकास मंत्री म्हणून कोल्हापूर शहरास न्याय देण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत. मंजूर निधीतून शहराचा कायापालट होईलच, यासह शहरातील प्रमुख प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेवू, असे आश्वासित केले.

यावेळी गृहराज्यमंत्री नाम.शंभूराजे देसाई, शिवसेना सहसंपर्कप्रमुख खासदार संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.

Back to top button