LokSabha Elections | पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

LokSabha Elections | पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 'आमचं ठरलंय' : उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : सन 1978 पासून या परिसराला पाणी आणायचे ठरले होते. निमगाव केतकीकरांनी तर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची हत्तीवरून साखर वाटत मिरवणूक काढली होती. 45 वर्षांपासून अनेक निवडणुका आल्या-गेल्या. मात्र, पाणी आलं नाही. आजही आपण पाणी पाणीच करतोय. याची आपण जाण ठेवून आपल्या विचाराचा खासदार दिल्लीला पाठवा. केवळ डोळ्यात पाणी आणले म्हणजे पाणी मिळत नाही. ज्याच्या अंगात पाणी आहे तोच पाणी प्रश्न सोडवू शकतो. तो सोडवण्यासाठी मी, आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमचं ठरलयं. तुम्हाला शेतीकरिता पाणी द्यायचं, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निमगाव केतकीत दिली.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. 2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते. आमदार दत्तात्रय भरणे, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, तालुक्यातील लाकडी-निंबोडीचा प्रकल्पदेखील सुरू झाला आहे. पुढील अर्थसंकल्पात निरा नदीवर बंधारे टाकून पाणी अडवण्याची तरतूद करणार आहे. इतरांचा राग या निवडणुकीत काढू नका. सुनेत्रा पवार यांना संधी द्या, बारामतीच्या धर्तीवर इंदापूरचादेखील विकास करेन. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, या भागातील 50 वर्षांचा शेतीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचा आपल्याला खासदार निवडून द्यायचा आहे. आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, आपल्या भागाचा विकास आणि शेतीचे नंदनवन करण्यासाठी दुष्काळातून कायमची मुक्तता करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवायचे आहे.

प्रास्ताविक गावचे सरपंच प्रवीण दशरथ डोंगरे यांनी केले. या वेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, सावता परिषदेचे संघटक संतोष राजगुरू यांचे भाषण झाले. या वेळी भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, भाजप कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील, दशरथ डोंगरे, वसंत मोहोळकर, मयूरसिंह पाटील, मच्छिंद्र चांदणे, डॉ. शशिकांत तरंगे, बापूराव शेंडे, नानासाहेब शेंडे, तुषार जाधव, संदीप भोंग, तात्यासाहेब वडापुरे, गोरख आदलिंग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button