Big Fraud ! विमा सेल्स आॉफिसरने ठेवीदारांना घातला कोट्यवधींचा गंडा, नाशिकच्या मनमाड येथील प्रकार | पुढारी

Big Fraud ! विमा सेल्स आॉफिसरने ठेवीदारांना घातला कोट्यवधींचा गंडा, नाशिकच्या मनमाड येथील प्रकार

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुदत ठेव केलेल्या खातेदारांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा अपहार करून विमा सेल्स ऑफिसरने फरार झाल्याची धक्कादायक घटना युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत घडली आहे. यामुळे खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून, त्यांनी बँकेत धाव घेत अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. यावेळी खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दाणाणून सोडला. या प्रकरणी संशयित आरोपी संदीप देशमुख याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

बँक व्यवस्थापक अशोक जयराम सरोज यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, गेल्या सहा ते सात वर्षांपासून संदीप देशमुख (रा. चाळीसगाव) हा बँकेच्या मनमाड शहर शाखेत बँकेच्या विमा कंपनीचा सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याने बँकेतील काही मुदत ठेवीदारांच्या खात्यातून परस्पर काढून घेतली. तर काहींचे पैसे खात्यात जमा न करता त्यांना बनावट फिक्स डिपॉजिटचे सर्टिफिकेट दिले. अशा पद्धतीने एक कोटी ३९ लाख ६० हजार ५०० रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, मोठ्या रक्कमेचा अपहार असल्याने या गुन्ह्याचा तपास नाशिक आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रारंभी फसवणुकीची आकडा सुमारे दीड कोटीचा असला तरी तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एका खातेदारामुळे फुटले बिंग

सुभाष सांगळे हे शासकीय सेवेत कर्मचारी होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेले ४० लाख रुपये त्यांनी संदीप देशमुख याच्या मार्फत युनियन बँकेत फिक्स डिपॉजिट केले होते. आज ते एफडी तोडण्यासाठी आले असता ‘तुमच्या खात्यात पैसे नाही, तुम्ही एफडी या अगोदरच मोडलीय’, असे त्यांना सांगण्यात आले. यामुळे सांगळेंना मोठा धक्का बसला. त्यांनी बँक मॅनेजरला फिक्स डिपॉजिटचे सर्टिफिकेट दाखविले असता ते बनावट असल्याचे मॅनेजरने सांगितले. आयुष्यभराची पुंजी ठगली गेल्याचे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांची चर्चा केली अन‌् या फसवणुकीची वार्ता शहरात पसरली. अनेकांनी बँकेत धाव घेत आपल्या खात्याची स्थिती जाणली असता काहींच्या खात्यात ही पैसे नसल्याचे उघड झाले आणि एकच गोधळ उडाला.

वरिष्ठ अनभिज्ञ कसे?

हा सर्व प्रकार दोन दिवसापूर्वीच बँक प्रशासनाच्या लक्षात आला होता. त्यामुळे व्यवस्थापनाने मॅनेजरसह काही कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. एवढा मोठा घोटाळा अधिकाऱ्यांच्या लक्षात कसा आला नाही? असा सवाल खातेदार करत आहेत. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हात तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या बाबत विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा –

Back to top button