नागपूर : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मौदा येथे बालकाचा मृत्यू | पुढारी

नागपूर : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मौदा येथे बालकाचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यामधील गणेश नगर परिसरातील तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बालक गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वंश असे या मृत मुलाचे नाव आहे. वंशचे वडील कामावर गेले होते तर आई घरकामात व्यस्त असताना वंश खेळता- खेळता घराच्या बाहेरील गेटजवळ गेला. या ठिकाणी 2 ते 3 मोकाट कुत्रे होते. अचानक या कुत्र्यांनी वंशवर हल्ला केला. हल्ल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांना वंशच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज आल्याने, त्या लोकांनी धाव घेत वंशला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.

यानंतर शरीराचे लचके तोडल्याने वंश गंभीररित्या जखमी अवस्थेत पडला होत. यानंतर जखमी मुलाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय आधिकऱ्यांनी दिली. या घटनेनंतर परिसरात लोकांमध्ये मोकाट कुत्रांबद्दल दहशत निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कुत्र्यांनी वंशची मान तोंडात धरली होती. दरम्यान मानेची मुख्य नस कापल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे.

कोल्हापुरातही घडली होती अशीच घटना

कोल्हापुरातील महापालिका चौकात भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या तरुणीचा रेबीजची लागण होऊन मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिने रेबीज प्रतिबंधक लसही घेतली होती. सृष्टी सुनील शिंदेअसे तिचे नाव आहे. शहरातील भटक्या श्वानाचा ती बळी ठरल्याची घटना काही दिवसांपुर्वी समोर आली होती.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

श्वान हल्यात लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने संपुर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अशा घटना पुन्हा होवू नयेत यासाठी प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी आणि मोकाट श्वानांच्या समस्येवर ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत.

हेही वाचा :

Back to top button