Pune : मशिनवर अलर्ट अन् वाहन चोरट्यांना धोक्याची घंटा! | पुढारी

Pune : मशिनवर अलर्ट अन् वाहन चोरट्यांना धोक्याची घंटा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाहन चोरीचे दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या चोरट्यांची माहिती एकत्र करण्यास गुन्हे शाखेकडून सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांनादेखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. चोरी झालेल्या वाहनांची माहिती ई-चालान मशिनमध्ये अपडेट करण्यात येत आहे. नाकाबंदीदरम्यान ही वाहने मिळून आली तर मशिनमध्ये अलर्ट येतो, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली. त्यामुळे मशिनवरच अलर्ट येणार असून, आता वाहन चोरट्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. चालू वर्षातील अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत (24 मार्च 2024) चोरट्यांनी शहरातून 1 कोटी 51 लाखांची तब्बल 400 वाहने चोरी केली आहेत, तर मागील सव्वातीन वर्षांत शहरातून 24 कोटी 68 लाखांची सहा हजार वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत. शहरात वाहनांची संख्या मोठी आहे. त्यातही दुचाकींची संख्या सर्वाधिक, त्यामुळे पुण्यात वाहन चोरीमध्ये दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. शहरातून दिवसाला सात ते आठ वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली असून, विशेष मोहीम हाती घेतली आहे.

वाहन चोरी करणारे चोरटे त्याच परिसरातील असतात, अनेकदा त्यांच्यावर पोलिसांचे मॉनिटरिंग कमी पडते. त्यामुळे सध्या गुन्हे शाखेकडून दोनपेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्यांची कुंडली तयार केली जाते आहे. त्याचबरोबर चोरी झालेल्या वाहनांची माहिती एकत्र करून ई-चालान मशिनमध्ये भरली जात आहे. नाकाबंदीच्या वेळी वाहने तपासणीदरम्यान त्याचा फायदा होणार आहे. चोरीचे वाहन जर आढळून आले, तर मशिनमध्ये अलर्ट येईल. शहरातून चोरी करण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्या अनुषंगाने सुद्धा गुन्हे शाखेने आता काम करण्यास सुरुवात केल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

घटनास्थळांना तत्काळ भेट

वाहन चोरीच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेबरोबरच स्थानिक पोलिसांची पथके घटनास्थळाला तत्काळ भेट देणार आहेत. घटनास्थळाला भेट दिल्यामुळे गुन्ह्याचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर वाहन चोरीचा गुन्हा तत्काळ दाखल केला, तर त्याचा गुन्ह्याचा छडादेखील लवकर लागतो. त्यामुळे पुढील कालावधीत पोलिस या सर्व बाबींवर काम करणार आहेत.

वाहन चोरट्यांनी माहिती एकत्र करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, ई-चालान मशिनमध्ये चोरीच्या वाहनांबाबत अपडेट करण्यात येत आहे. नाकाबंदीदरम्यान चोरीचे वाहन आढळून आले, तर त्याचा अलर्ट येतो. वाहन चोरींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील.
– शैलेश बलकवडे,
अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

हेही वाचा

Back to top button