Ratnagiri news : ‘लेक लाडकी’ करणार ‘लखपती’

Ratnagiri news : ‘लेक लाडकी’ करणार ‘लखपती’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रात दि. 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेंतर्गत एक लाख एक रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या खात्यातून घेता येणार आहे. (Ratnagiri news)

या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी सक्षमीकरणासाठी ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्तखाते उघडून 'लेक लाडकी' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पोस्ट खात्यामार्फत केले आहे.

पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे.

Ratnagiri news : लेक लाडकी या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणार्‍या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसर्‍या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. पहिल्या अपत्याच्या तिसर्‍या हप्त्यासाठी व दुसर्‍या अपत्याच्या दुसर्‍या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

'या' योजनेसाठी कुठे कराल अर्ज ?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचे आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यावयाची आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news