माथ्यावर तळपे ऊन! | पुढारी

माथ्यावर तळपे ऊन!

केवळ देशातच नव्हे, तर महाराष्ट्रातही सध्या तापमानवाढीचा अनुभव येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटास पावसाने हजेरी लावली; परंतु आता पुन्हा तापमान वाढत असून, विदर्भात तर पारा 42 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेला आहे. कमाल आणि किमान दोन्हीही तापमान वाढत आहे. विदर्भात ब्रह्मपुरी येथे 42.3 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला येथेही उन्हाळा भाजून काढत आहे. विदर्भात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, तरीही तापमानात मात्र फारशी घट होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत देशात यंदा बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. चिंतेची बाब म्हणजे, याच काळात भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तीव्र उन्हाळ्यामुळे मतदानाचा टक्का घसरू शकतो. (Temperature)

अशावेळी निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रांवर आच्छादनांची नीट सोय असेल, हे पाहिले पाहिजे. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असणे जरूरीचे आहे. तसेच मतदान केद्रांवर जाण्या-येण्यासाठी सोयीची अशी वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी 80 वर्षांवरील ज्येष्ठांसह किमान 40 टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत येता येत नसल्यास, त्यांना घरी बसूनच मतदान करता येणार आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी असा प्रयोग झाला होता. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून करण्यात येणारी ‘होम व्होटिंग’ची ही सुविधा स्वागतार्हच म्हणावी लागेल. हवामान बदलाच्या परिणामी पाऊस केव्हाही व कसाही पडतो. यावेळी तर थंडीचा कालावधीही कमी होता. आता वसंत ऋतूचाही कालावधीही कमी होत चालला आहे. गेल्या दशकभरात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यांचे ऋतुचक्रच कमालीचे पालटून गेले आहे. 2022 हे वर्ष असे होते की, 1901 नंतरचा मार्चमधील सर्वात तीव्र उन्हाळा तेव्हा बघायला मिळाला. गेल्या वर्षीही मार्चपासूनच उष्णतेची लाट सुरू झाली आणि देशातील अनेक भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. यावेळी मार्चमध्ये दक्षिण भारताने नेहमीपेक्षा जास्त तीव्रतेचा उन्हाळा पाहिला.

सध्या टोकाच्या स्वरूपाचे हवामान सातत्याने अनुभवास येऊ लागले आहे. गेल्या सोमवारी आयएमडीने चार ते आठ दिवसच उष्णतेची लाट असेल, असा अंदाज व्यक्त केला होता; परंतु नंतर तो बदलून दहा ते वीस दिवस अशीच हवा असेल, अशी शक्यता वर्तवली. उष्णतेच्या लाटेचा आरोग्यावर कशा पद्धतीने परिणाम होत आहे, त्यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, याबद्दलची आयएमडी, नॅशनल डिझास्टर मॅनेजनमेंट एजन्सी (एनडीएमए) आणि नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो यांची आकडेवारी वेगवेगळी आहे. केंद्र सरकारने याची तातडीने दखल घेऊन विश्वासार्ह आकडेवारी संकलित करण्याची पद्धत निश्चित केली पाहिजे; कारण आजच्या काळात सांख्यिकी विश्लेषणाला खूप महत्त्व असून, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करून घेता येईल. कोणत्याही नैसर्गिक संकटाचा गोरगरीबवर्गाला अधिक फटका बसतो, हे लक्षात घेऊन, त्याद़ृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

सन 2010 मध्ये भयंकर अशा उष्म्याच्या लाटेमुळे केवळ अहमदाबादेत 800 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ आणि अमेरिकेतील काही आरोग्यतज्ज्ञांनी मिळून उष्णतेच्या लाटेचा प्रतिकार करणारी योजना तयार केली होती. उष्म्याची लहर येणार असेल, तर त्याचा वेळेवर पूर्व-इशारा देणे, डॉक्टरांची आणि आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या वाढवणे, कामाच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक व्यवस्था निर्माण करणे अशा गोष्टींचा या कृती आराखड्यात समावेश होता. त्यामुळे नंतरच्या काळात दरवर्षी उष्णतेच्या लाटेपासूनचे हजार मृत्यू तरी थोपवले गेले. अमेरिकेतील प्रसिद्ध विज्ञान लेखक किम स्टेनली रॉबिन्सन यांची ‘द मिनिस्ट्री फॉर द फ्युचर’ ही कादंबरी चार वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आणि ती खूपच खपली. ‘आभाळातून एखाद्या अणुबाँबसारखी उष्णता येत आहे.

डोळे जळतात, प्रत्येक गोष्ट धूसर दिसते, सहन होण्यापलीकडचा प्रखर प्रकाश सर्वत्र असतो, पाण्यानेही काम भागत नाही; कारण पाणीही हवेपेक्षा गरम असते. अशावेळी लोक पटापटा मरतात,’ अशा शब्दांत रॉबिन्सन यांनी त्यात भारतातील उष्म्याच्या लाटेचे दाहक वर्णन केले होते. गेल्या वर्षी नवी मुंबईत कडक उन्हात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने 12 जणांचा मृत्यू झाला. आताच्या निवडणुकांतही काही नेत्यांच्या प्रचार रथयात्रेत शालेय विद्यार्थ्यांनाही राबवून घेतल्याची उदाहरणे घडली आहेत. राजकीय नेत्यांनी किमानपक्षी या गोष्टी तरी टाळल्या पाहिजेत. उष्णतेबाबत संवेदनशील असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. 2050 पर्यंत भारतात उष्ण दिवस व रात्रींच्या संख्येत दुप्पट ते चौपट वाढ होईल, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. मुळात तापमानवाढीमुळे 1901 ते 2018 दरम्यान भारताच्या तापमानात 0.7 टक्क्याची वाढ झालेली आहे.

1992 ते 2015 या कालावधीत उष्णतेमुळे किमान 22 हजार लोक हे जग सोडून गेले आहेत. उन्हातान्हात काम करणारे शेतमजूर, बांधकाम कामगार, गर्भवती, वयोवृद्ध आणि लहान मुले यांचे उन्हापासून संरक्षण करण्याची अधिक गरज आहे. अधिकृतपणे बालकामगार ठेवता येत नसले, तरी आपल्याला लहान मुले बांधकामाच्या ठिकाणी अथवा इतर ठिकाणी काम करताना दिसतात. ठिकठिकाणी शहरीकरण होत असून, काँक्रिटचे रस्ते आणि काँक्रिटची जंगले, काचेचा पृष्ठभाग असलेली कंपन्यांची कार्यालये आणि झाडांचा विनाश यामुळे आपण सर्वजणच वाढत्या उष्णतेचा अनुभव घेत असतो. निसर्गाचे शोषण करणारी जीवनपद्धती बदलल्याशिवाय उष्णतेचे हे चक्र थांबणार नाही.

Back to top button