Pune : चाकणचा पाणी प्रश्न लवकरच संपुष्टात | पुढारी

Pune : चाकणचा पाणी प्रश्न लवकरच संपुष्टात

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 160 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. चाकण शहराची पुढील 50 वर्षांपर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना करण्यात येणार आहे. या योजनेचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. सदर योजनेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह इतरांकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी भेटून यासाठी प्रयत्न केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. चाकण शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आढळराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 10) झाले. नितीन गोरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या या विकासकामाचे भूमिपूजन प्रसंगी आढळराव बोलत होते. या वेळी माजी नगराध्यक्ष, नगसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आढळराव आणि नितीन गोरे यांनी चाकणच्या पाणी योजनेबाबत माहिती दिली.

या वेळी शहरातील विविध प्रभागात विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये भरत कानपिळे घर ते सारा ऑर्चीड सोसायटीपर्यंत ओढ्याला संरक्षक कठडा, प्रभाग क्र.21 मधील वडवेनगर रस्ता काँक्रीटीकरण, चक्रेश्वर मंदिर येथील मनशक्ती आश्रम ते काळूस रोड पुलापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, चाकण पार्कमध्ये रस्ता काँक्रीटीकरण, स्ट्रीट लाईट बसविणे, मोहन पार्क येथे रस्ता काँक्रीटीकरण, सावतामाळी चौक ते ऐश्वर्या आंगणपर्यंत रस्ता रुंदीकरण, झित्राई माता मंदिर परिसर काँक्रीटीकरण, प्रभाग क्र.1 मधील नाला ते केदारी घर रस्ता काँक्रीटीकरण, चौधरी ट्रेडर्स ते नितीन अहेर घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, सावतामाळी मंदिरासमोरील जागेत काँक्रीटीकरण, आंबेठाण रोड भागात काँक्रीटीकरण व गटार लाईन, आंबेठाण रोड ते ऐश्वर्या आंगणदरम्यान स्ट्रीट लाईट आदी कामांचा समावेश आहे.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, माजी नगराध्यक्षा मंगल गोरे, स्नेहा जगताप, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश गोरे, ऋषिकेश झगडे, गटनेते नीलेश बबनराव गोरे, शिवसेना चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी, नगरसेवक प्रवीण गोरे, नगरसेविका सुजाता मंडलिक, रोनक गोरे, बिपिन रासकर, युवासेना शहरप्रमुख अभिजित जाधव, शिवसेना सरचिटणीस धनंजय फडके, रोहकल गावच्या सरपंच प्रमिला काचोळे, संदीप कचोळे, पांडुरंग गोरे, रत्नेश शेवकरी आदी उपस्थित होते.

विकासकामांसाठी पाठपुरावा : नितीन गोरे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले की, चाकण शहराच्या प्रत्येक भागात विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुढील काळातही चाकण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आंबेठाण चौक ते ऐश्वर्या आंगण सोसायटीपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन मंजूर झालेल्या महामार्गाचे काम होईपर्यंत वाकीफाटा ते आळंदीफाट्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आढळराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

 

 

Back to top button