विजयस्तंभ अभिवादनदिनी कडकोट बंदोबस्त ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर | पुढारी

विजयस्तंभ अभिवादनदिनी कडकोट बंदोबस्त ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी सोमवारी (दि. 1) होणारी गर्दी, तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रभारी सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख आदी उपस्थित होते.

यासाठी 4 अपर पोलिस आयुक्त, 11 पोलिस उपायुक्त, 42 सहायक आयुक्त, 86 पोलिस निरीक्षकांसह तीन हजार दोनशे अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा तुकड्या, बॉम्बनाशक पथक असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. त्याबरोबरच बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांसह तीन हजार 200 अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलासह बाहेरील जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावतात. त्यामुळे येथे लाखोंची गर्दी होते.

या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. विजयस्तंभ अभिवादनासाठी गतवर्षीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली असून, वाहनांना पार्किंग, वाहतूक बदल आदींचे नियोजन करण्यात आले आहे.

…असा आहे बंदोबस्त

  • अपर पोलिस आयुक्त – 4
  • पोलिस उपायुक्त – 11
  • सहायक आयुक्त – 42
  • पोलिस निरीक्षक – 86
  • सहायक – उपनिरीक्षक – 271
  • पोलिस अंमलदार – 3,200
  • एसआरपीएफ – 6 कंपन्या
  • बीडीडीएस – 9 पथके
  • क्यूआरटी – 3 पथके

हेही वाचा

Back to top button