पश्चिम महाराष्ट्रातील 20 हजार ग्राहकांची वीज खंडित | पुढारी

पश्चिम महाराष्ट्रातील 20 हजार ग्राहकांची वीज खंडित

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वीज बिलांच्या थकबाकीमुळे गेल्या 25 दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 20 हजार 328 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर- 2094 आणि सांगली जिल्ह्यातील 2776, पुणे जिल्हा- 11,182 सातारा- 1823, सोलापूर- 6008, थकबाकीदारांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 15 लाख 74 हजार 580 वीजग्राहकांकडे 310 कोटी 17 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती 13 लाख 98 हजार 449 ग्राहकांकडे 218 कोटी 30 लाख तसेच वाणिज्यिक 1 लाख 52 हजार 900 ग्राहकांकडे 62 कोटी 9 लाख, तर औद्योगिक 23 हजार 231 ग्राहकांकडे 29 कोटी 78 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणकडून वसुली मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) कोल्हापूर- 20 कोटी 33 लाख (1,77,938) आणि सांगली जिल्ह्यात 20 कोटी 73 लाख रुपयांची (1,79,726) थकबाकी आहे. वीजग्राहकांसाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 30) व रविवारी (दि. 31) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. तसेच वीजग्राहकांना www. mahadiscom. in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाईन पद्धतीने विनामर्यादा वीज बिल भरता येते.

Back to top button