जयस्तंभ अभिवादन दिन तयारी पूर्ण; एक जानेवारीपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने

जयस्तंभ अभिवादन दिन तयारी पूर्ण; एक जानेवारीपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारी 2024 रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (31 डिसेंबर) सायंकाळी पाचपासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहतूक बदलाबाबतचे माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक एक जानेवारी 2024 रोजी रात्री बारापर्यंत लागू राहणार आहे. पुण्याकडून नगरकडे जाणार्‍या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणार्‍या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणार्‍या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणार्‍या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जावे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणार्‍या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुयायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

इथे करता येतील वाहने पार्क

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणार्‍या अनुयायांसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे : लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, मोनिका हॉटेलशेजारी, ओमसाई हॉटेलच्या पाठीमागे, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी, राजेशाही मिसळ हॉटेलच्या मागे, तुळापूर रस्ता वाय पॉईंट, हॉटेल शेतकरी मिसळजवळ, तुळापूर फाटा हॉटेल रॉयल शेजारी, फुलगाव सैनिकी शाळा मैदान, सोमवंशी कडमी, थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, पेरणे फाटा छत्रपती श्रीशिवाजी महाराज पुतळा.

महावितरणची यंत्रणा सज्ज

शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखो नागरिक भीमा कोरेगाव येथे येणार आहेत. या कार्यक्रमात महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच सुरळीत वीजसेवा देण्यासाठी 35 अभियंते व जनमित्रांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गुरुवारी विजयस्तंभ परिसरातील वीजपुरवठा व सुरक्षेसाठी केलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, उपकार्यकारी अभियंता विजय जाधव आदी उपस्थित होते.

पेरणे परिसरात अत्यंत गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सात रोहित्रांना वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण लावण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या 11 लाख 82 हजार रुपयांच्या निधीतून पेरणे येथे दोन रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली असून, जुन्या वीजतारा बदलण्यात आल्या आहेत. जयस्तंभ परिसरातील 11 वितरण पेट्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे.

लघुदाब वीजवाहिन्यांना 31 ठिकाणी स्पेसर्स बसविण्यात आले आहे. तसेच परिसरातील संपूर्ण वीजयंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे व सुरक्षा उपायांचे काम पूर्ण झाले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध स्टॉल्स, वैद्यकीय सोयी व इतर ठिकाणी मागेल त्याला तात्पुरती नवीन वीजजोडणी तत्काळ देण्याचे काम सुरू आहे. यासोबतच मानवंदना कार्यक्रमासाठी सुरळीत वीजपुरवठा व ग्राहकसेवा देण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांसह सहायक अभियंता कैलास कांबळे व दीपक बाबर यांच्यासह 30 जनमित्रांची कार्यक्रम संपेपर्यंत विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news