गोंदिया: म्हसगाव येथे जमिनीच्या वादातून खून केल्याची चुलतभावाची कबुली | पुढारी

गोंदिया: म्हसगाव येथे जमिनीच्या वादातून खून केल्याची चुलतभावाची कबुली

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा :  गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील ढिवरू इसन इळपाचे (वय ५५) हा घरी झोपलेला असताना अज्ञातांनी त्याच्या घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने त्याची हत्या केल्याची घटना गुरुवार (दि. २) सकाळी उघडकीस आली होती. विशेष म्हणजे, शेजारीच लग्नाचा आशिर्वाद समारंभ असताना हे हत्याकांड घडवून आणल्याने आरोपीला पकडण्याचा मोठा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला होता. मात्र, दोन दिवसांतच पोलिसांनी याचा छडा लावला असून मृताचा काकेभाऊच त्याचा खूनी असल्याचे समोर आले आहे. तर जमिनीच्या वादातून त्याचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. विरेंद्र बेनीराम इळपाचे (वय २८ रा.म्हसगाव ) असे त्या आरोपी काकेभावाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसगाव येथील ढिवरु इळपाचे हा पत्नी, मुलगा व आईसह राहत होता. दरम्यान, त्याचा मुलगा नागपूर बुट्टीबोरी येथे कामाकरीता गेला असतानाच घटनेच्या दिवशी मृताची पत्नी नातेवाईकांकडे लग्नकार्यात गेली होती. त्यामुळे मृत ढिवरू व त्याची आई दोघेच घरी होते. तर घराच्या शेजारीच त्याचा काकेभाऊ विरेंद्र इळपाचे राहत असून ढिवरु व विरेंद्र याच्यांत घराच्या जमिनीवरुन वाद विवाद होता. या वादामुळे ढिवरुचा कायमचा काटा काढण्याचा राग विरेंद्र आपल्या मनात ठेवून होता. अनावधानाने बुधवारी रात्री घराशेजारी बळीराम मोहनकर यांच्या नातवाच्या लग्नाचा आशिर्वाद समारंभ असल्याने परिसरात वऱ्हाड्यांची रेलचेल होती.

मृताची पत्नी व मुलगा बाहेरगावी असल्याची संधी साधली

तर मृताची पत्नी व मुलगा बाहेरगावी होते. या संधीचा फायदा विरेंद्रने घेतला व मध्यरात्री ढिवरु हा झोपेत असताना धारदार शस्त्राने त्याचा खुन केला. गुरुवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस व सायबर सेलच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. व गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. मात्र, मृत ढिवरू याचा गावात कुणाशीही काही वैर नाही, कुटूंबातही कसलाच कलह नाही. त्यात घराशेजारी कार्यक्रम असल्याने वऱ्हाड्यांची ये-जा असताना ढिवरूचा खून कोण करणार? अशी अनेक प्रश्न पोलीसांपुढे निर्माण झाली होती.
मात्र, दोन दिवसांतच पोलिसांनी याचा उलगडा करत शनिवारी ( दि.४) आरोपी विरेंद्र यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली ज्यामध्ये त्याने जमिनीच्या वादातून खून केल्याचे  कबूल केले. दरम्यान, आरोपीने कोणत्या हत्याराचा वापर केला? यात त्याचे आणखी काही साथीदार आहेत का ? याचा तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.

पुढील तपास सुरू आहे…

म्हसगाव येथील हत्या प्रकरणात मृताच्या काकेभावाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याने गुन्हा देखील कबुल केलेला आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.
अजय भुसारी, पोलीस निरीक्षक, गोरेगाव
हेही वाचा 

Back to top button