Pune Crime News : सराईत गुन्हेगार आहेरकर टोळीवर मोक्का | पुढारी

Pune Crime News : सराईत गुन्हेगार आहेरकर टोळीवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोणी काळभोर परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार अभिजित आहेरकर याच्यासह साथीदारांवर लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. अभिजित आभिमन्यू आहेरकर (22, रा. लोणी काळभोर), अभिषेक दत्तात्रय रामपुरे (20, रा. कदमवाक वस्ती), प्रथमेश गणेश आयरे (19, रा. लोणी काळभोर) अन्य दोन अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

सप्टेंबर महिन्यात एक जण लोणी काळभोरमधील इंदिरानगर चौकात गप्पा मारत थांबले होते. या वेळी दोघांनी त्यांना दुचाकीवरून कट मारला. त्याचा जाब विचारला असता, आरोपी आहेरकर व साथीदारांनी त्यांना मारहाण केली. आम्ही लोणी गावचे बाप आहोत, असे हातामध्ये कोयते घेऊन दहशत माजविली. आहेरकर याने साथीदारांसह परिसरात गंभीर गुन्हे केले आहेत.

यामुळे त्याच्यासह साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आला. शर्मा यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. सहायक पोलिस आयुक्त आश्विनी राख पुढील तपास करीत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 83 वी कारवाई आहे.

हेही वाचा

Back to top button