ट्रकच्या धडकेत दोन ठार; शेकडो शेळ्या मृत्युमुखी | पुढारी

ट्रकच्या धडकेत दोन ठार; शेकडो शेळ्या मृत्युमुखी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : परस्पर विरूद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोनजण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झालेत. याशिवाय शेकडो शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ आज सकाळी (दि.2) ही घटना घडली.

चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या एमएच 40 एम 2858 क्रमांकाचा ट्रक आणि मध्यप्रदेशातून तेलंगणात बकऱ्या भरून निघालेला एमएम 40 सीटी 5558 क्रमांकाचा ट्रक, या दोन ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात मध्य प्रदेशातील सोहन सिंह रामचरण यादव व मुहूर्त धर्मेंद्र हिरालाल यादव हे दोघे जागीच ठार झाले. दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाले आहे. ट्रकमधील सुमारे ३०० शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.

या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात रवाना करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी मरण पावलेल्या शेळ्यांचा मोठा खच पडून आहे.

Back to top button