कोल्हापूरकरांच्या आशीर्वादानेच योजना पूर्ण : आमदार सतेज पाटील

कोल्हापूरकरांच्या आशीर्वादानेच योजना पूर्ण : आमदार सतेज पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर : स्वच्छ व मुबलक पाणी ही कोल्हापूरकरांची गेल्या पाच दशकांतील माफक अपेक्षा दुर्लक्षित होती. आमदार झाल्यावर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. थेट पाईपलाईन योजना मंजूर झाल्यानंतरही त्यात अनंत अडचणी आल्या; मात्र मी प्रामाणिक आणि आशावादी प्रयत्न करत राहिलो. त्याला कोल्हापूरकरांचा आशीर्वाद मिळत गेला आणि योजना पूर्ण झाली. काळम्मावाडी धरणातील पाणी कोल्हापुरात आले.

शहरवासीयांना दिलेला शब्द पाळला आणि इच्छापूर्तीचाही आनंद झाला, अशा शब्दात आ. सतेज पाटील यांनी आपल्या भावना दै. 'पुढारी'शी बोलताना काढले.

प्लस पॉईंट हा ठरला…

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कालावधीत 2010 मध्ये थेट पाईपलाईन योजनेला मंजुरी न मिळाल्यास 2014 ची विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. राज्य आणि केंद्र शासनाकडे अथक प्रयत्न करून अखेर योजना मंजूर करून घेतली. 2013 मध्ये तांत्रिक आणि 2014 मध्ये अंतिम मंजुरी मिळाली. त्याचवेळी केंद्रात सत्ताबदल झाला. भाजप सरकारने मंजुरी मिळालेल्या सर्व योजना रद्द केल्या. मात्र कोल्हापूरकरांच्या इच्छाशक्तीमुळेच थेट पाईपलाईन योजना रद्द झाली नाही. कारण मंजुरीनंतर तत्काळ थेट पाईपलाईनचे काम सुरू करून धनादेश काढले होते. हा निर्णय प्लस पॉईंट ठरला.

पालकमंत्रिपदामुळे योजनेला गती

काळम्मावाडी धरण क्षेत्रात योजनेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. धरणातील कॉपर डॅम दोनवेळा ढासळला. कोव्हिडमुळे दोन वर्षे गेली. विविध विभागांच्या परवानग्या मिळाल्या नसल्याने काम बंद ठेवावे लागले. काही गावांत योजनेविषयी गैरसमज होते. ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर तत्काळ कामाला परवानगी दिली. त्यामुळे ग्रामस्थांना धन्यवाद. मला कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर योजनेच्या कामाला गती देता आली. सर्व प्रश्न सुटत गेले आणि कोल्हापूरकरांची मागणी पूर्णत्वास आली, असेही आ. पाटील यांनी सांगितले.

सार्वजनिक आयुष्यातील सर्वोच्च क्षण

थेट पाईपलाईनचे पाणी शुक्रवारी (दि. 10) कोणत्याही क्षणी कोल्हापुरात येईल, अशी स्थिती होती; मात्र काळम्मावाडी धरण क्षेत्रात योजनेच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी वाट पहात बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या पायर्‍यांवर पुईखडीत पाणी कधी येणार, अशी वाट पाहत बसलो होतो. ग्रॅव्हिटीने पाणी येत असल्याने जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कमी-जास्त होत होते. मनात प्रचंड धाकधूक होती. कार्यकर्त्यांचा फोन आला आणि पळतच गाडीत जाऊन बसलो. चालकानेही गाडी सुसाट चालविली. अवघ्या काही मिनिटांत पुईखडीत पोहोचलो. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतच जलशुद्धीकरण केंद्र गाठले. त्याठिकाणी गेलो आणि जलशुद्धीकरण केंद्रात काळम्मावाडी धरणातील पाणी पडताना पाहून आनंदाश्रू रोखू शकलो नाही. नारळ वाहून पाण्याचे पूजन केले. सार्वजनिक आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण ठरला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news