दुर्दैवी : बैलगाडी विहिरीत कोसळून बैलाचा मृत्यू; बैलगाडी चालक सुखरुप बचावला | पुढारी

दुर्दैवी : बैलगाडी विहिरीत कोसळून बैलाचा मृत्यू; बैलगाडी चालक सुखरुप बचावला

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : एकाच बैलाची गाडी जुंपून जनावरांना चारा आणायला निघालेली बैल अज्ञात आवाजाला घाबरून बिचकल्याने व बैलाने मुसंडी मारल्याने बैलासह गाडी अचानक सुमारे ६० ते ७० फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळली. या घटनेत बैल जागेवरच गतप्राण झाला असून प्रसंगावधान राखीत बैलगाडी चालक तरुण शेतकऱ्याने विहिरीत कोसळणाऱ्या बैलगाडीतून वेळीच बाहेर उडी मारल्याने तो तरुण शेतकरी सुदैवाने बचावला.

ही दुर्घटना खामुंडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी दिपक ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या मालकीच्या सोमनाथ नगर तेलदरा येथील शिवारातील विहीरीवर बुधवारी (दि. १) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. दीपक कोकाटे यांचा मुलगा प्रणव कोकाटे (वय २२) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा तरुण वाचल्याची चर्चा परिसरात आहे. आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांच्या झालेली दुर्घटना लक्षात आल्यावर प्रथम सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांना संपर्क केला.

बोडके यांनी आळेफाटा येथील क्रेन मालक कैलास पुरी यांना संपर्क करून तात्काळ क्रेनला पाचरण करण्यात आले. शेतकरी दिपक कोकाटे आणि मुलगा बाबू कोकाटे यांनी क्रेनच्या सहाय्याने खाली विहिरीत काळोखात उतरून तसेच खामुंडी गावातील तरुणांच्या मदतीने अथक प्रयत्न करून बैलाचा मृतदेह आणि बैलगाडी रात्री १:३०च्या सुमारास विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून शेतकऱ्याचा आत्मा असलेला व जिव्हाळ्याचे नाते असलेला एक उमदा बैल गमावल्याचे दुःख शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

हेही वाचा

Back to top button