सातारा : धडाम्धूम सुरू; आज लक्ष्मीपूजन | पुढारी

सातारा : धडाम्धूम सुरू; आज लक्ष्मीपूजन

सातारा; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीची धामधूम आता खर्‍या अर्थाने शिगेला पोहोचली असून वसुबारस, धनत्रयोदशीनंतर आता रविवारी दिवाळीची पहिली आंघोळ अर्थात अभ्यंगस्नान होत आहे. यंदा पहिल्या आंघोळीलाच लक्ष्मीपूजन आल्यामुळे फटाक्यांचा आवाज आणखी वाढणार आहे. अवघं जनजीवन दीपोत्सवाने न्हाऊन गेले असून सर्वत्र दिवाळीचाच माहोल तयार आहे. आजपासून खर्‍या अर्थाने फटाके फुटणार असून आसमंत दणाणून जाणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पूर्वसंध्येेला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली.

वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा हा उत्सव आजपासून खर्‍या अर्थाने सुरू होत आहे. वसुबारस व धनत्रयोदशी झाल्यानंतर आज रविवारी पहिले अभ्यंगस्नान व लक्ष्मीपूजन असल्याने घरोघरी दीपोत्सवाच्या माहोलाला आजपासून आणखी उधाण येणार आहे. घरोघरी दिवाळी फराळ करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. बच्चे कंपनीला फटाके फोडण्याचे वेध लागले आहेत. प्रदुषण मुक्तीसाठी अनेक सामाजिक संस्था प्रबोधनपर कार्यक्रम राबवत असले तरी फटाक्यांचा आनंद लुटला जातोच. त्यामुळे आज पहाटेपासूनच धडामधूम सुरू होणार आहे. शहरात विविध ठिकाणी आकषर्र्क विद्युत रोषणाई केल्यामुळे अवघा आसमंत उजळून निघाला आहे.

Back to top button