चैत्र वसंतोत्सव आला; बहावा बहरला! | पुढारी

चैत्र वसंतोत्सव आला; बहावा बहरला!

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : सध्या सूर्य आग ओकत असतानाच उन्हाच्या तप्त झळांमध्ये रस्त्याच्या कडेला बहरलेला ‘बहावा’ लक्ष वेधून घेत आहे. जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी बहाव्याचे वृक्ष सध्या मोठ्या प्रमाणात बहरल्याचे पाहायला मिळत आहेत. जुन्नर-नारायणगाव रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयाजवळ पिवळ्याधमक फुलांची आरास गुंफणारा बहावा बहरला आहे. बहावाच्या फुलांच्या बहरावरून पाऊस वेळेवर व चांगला होण्याचे संदेश मिळतात. यावरून शेतकरी बांधवांना पावसाचा अंदाज काढता येतो.

बहावा ही आकर्षक पिवळ्या रंगाची फुले येणारी वनस्पती आहे. बहावा फुलण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. एप्रिल महिन्यात बहावा ही वनस्पती पूर्णत: फुलून येते. बहावा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून 30-60 फुटांपर्यंत याची वाढ होते. उन्हाळ्याच्या सुरवातीला बहाव्याची पानगळ सुरू होते आणि एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी सर्व पाने गळून फुले लागायला सुरवात होते. फुलांचा रंग सोनेरी पिवळा असतो, त्यात फुलांची मांडणी फुलोर्‍यावर अशा पद्धतीने असते की त्याला द्राक्षांच्या घडाचं स्वरूप यावं. फुलोर्‍यांची संख्या इतकी जास्त असते की संपूर्ण झाड पिवळ्या रंगाने भरून जातं. एकदा फुलं लागली की पक्षी, मधमाशा, फुलपाखरे आणि इतर कीटकांची गर्दी जमायला सुरवात होते, यातून परागीभवनाची प्रक्रिया सुरू होते. साधारणपणे पहिल्या पावसापर्यंत बहावा फुललेला असतो, पुढे साधारणपणे 1-2 फूट लांबीच्या शेंगा लागतात.

बहाव्याचे आयुर्वेदामध्ये देखील विशेष महत्त्व आहे, शेंगामधील गर आणि मुळं बद्धकोष्टाच्या समस्येवर अतिशय गुणकारी औषध म्हणून वापरतात. पाने आणि साल भाजल्यावर लावली जाते, कमीत कमी वेळात दाह कमी करण्याचे गुण त्यामध्ये आहेत. बहावा हा अतिशय कमी पाण्यात आणि भरभर वाढतो, त्यातल्या त्यात सुंदर फुलांमुळे बागेत आणि रस्त्याच्या दुतर्फा सजावटीसाठी याची लागवड केली जाते. जंगलामध्ये कोल्हे बहाव्याच्या शेंगा खातात आणि बीजप्रसारासाठी मदत करतात.

धार्मिक महत्त्व…

बहाव्याचे फूल हे केरळ राज्याचे राज्यफूल आहे. थायलंड देशामध्ये बहाव्याला राष्ट्रीय वृक्ष आणि राष्ट्रीय फुलाचा मान दिलेला आहे. भारतीय डाक विभागानेदेखील बहाव्याच्या फुलांच्या चित्राचे तिकीट छापलेलं आहे. भारतामध्ये बहाव्याला धार्मिक महत्त्व आहे, केरळमध्ये ’विशू’च्या सणाला पूजेमध्ये वाहण्यासाठी बहाव्याच्या फुलांचे विशेष महत्त्व आहे.

बहावा वृक्षाला निसर्गातील वातावरणाचे संबोधक (नेचर इंडिकेटर) असेही समजले जाते. कारण वातावरणाचा अभ्यास असलेली जुनी जाणकार अनुभवी माणसे असा तर्क लावतात की, ज्या दिवशी बहावा बहरतो, त्या दिवसापासून साधारण दोन महिन्यांनी (60 दिवसांनी) मान्सूनचा पहिला पाऊस पडतो आणि त्यानुसार शेतीच्या कामांचे नियोजन करणे सोपे जाते. पिवळी झुबकेदार फुले, उन्हाळ्यामध्ये अनेक कीटक, मधमाशा आणि पक्षांसाठी अन्नाचा स्त्रोत ठरतात.

– डॉ. विनायक लोखंडे, विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र, श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर

हेही वाचा

Back to top button