ज्येष्ठ, दिव्यांगांना 1500 रु. पेन्शन, भगिनींना मोफत घरे! | पुढारी

ज्येष्ठ, दिव्यांगांना 1500 रु. पेन्शन, भगिनींना मोफत घरे!

भोपाळ; वृत्तसंस्था : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना 1500 रुपये मासिक पेन्शन दिली जाणार आहे. सध्या ही रक्कम 600 रुपये आहे. भाजपचे सरकार आल्यास राज्यातील भगिनींना लाडली योजनेंतर्गत विनामूल्य घरेही दिली जातील. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीअंतर्गत भाजपने शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. कुशाभाऊ ठाकरे सभागृहात हा कार्यक्रम झाला. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष जयंत मलाय्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा उपस्थित होते. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

‘मोदींची गॅरंटी, भाजपचा विश्वास’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक आहे. महिला, गरीब, शेतकरी अशाप्रकारे समाजातील सर्वच घटकांना जोडण्याचे प्रयत्न या जाहीरनाम्यातून करण्यात आले आहेत. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना बालवाडी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येईल. मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) धर्तीवर मध्य प्रदेशातील प्रत्येक विभागात मध्य प्रदेश तंत्रज्ञान संस्था (एमआयटी) सुरू केली जाईल. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) धर्तीवर प्रत्येक विभागात राज्य वैद्यकीय विज्ञान संस्था (सिम्स) सुरू करण्यात येणार आहे. 100 रुपयांत 100 युनिट वीज देण्यात येणार आहे. सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजनासोबत नाश्ताही दिला जाईल. भोपाळ – इंदूरनंतर जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्येही आयुक्तालय प्रणाली लागू होणार आहे.

शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी भाजपने काँग्रेसपेक्षा जास्त दराने गहू आणि तांदूळ खरेदी करण्याची हमी दिली आहे. काँग्रेसने आपल्या आश्वासनांतून 2,600 रुपयांत प्रतिक्विंटल दराने तांदूळ आणि 2500 रुपये प्रतिक्विंटल दराने गहू खरेदी करण्यात येईल, असे म्हटले आहे. दुसरीकडे भाजपने गव्हाला 2700 रुपये, तांदळाला 3100 रुपये भाव देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

क्रीडा, कलेसाठी

प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा संकुले सुरू करण्यात येणार आहेत.
बघेली, बुंदेली, गौंडवाणी आणि भिलाऊ भाषा साहित्य अकादमींची स्थापना
प्रशासकीय
भोपाळमध्ये राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे नवीन कॅम्पस बांधणार
जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये आयुक्त प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

पर्यटनासाठी

नर्मदा, तापी आणि क्षिप्रा नद्यांच्या घाटांचे नूतनीकरण केले जाईल.
पर्यटनात 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक, 2 लाख तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगार देणार.
मैहर शारदा मंदिर, अमरकंटक शक्तिपीठ, उज्जैन हरसिद्धी मंदिराचा जीर्णोद्धार
चौगन, देवगड, मांडला, चौरागड आणि मदनमहाल किल्ल्यांचे नूतनीकरण
150 कोटींच्या गुंतवणुकीसह सर्व ऐतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण

शेतकर्‍यांसाठी काय?

गव्हाची 2700 रुपये, तांदळाची 3100 रुपये प्रति क्विंटलने खरेदी
गहू आणि तांदळाच्या किमान हमी भावावर बोनसची तरतूद

तरुणांसाठी काय?

10 हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड
प्रत्येक कुटुंबात किमान एक रोजगार, स्वयंरोजगार

आरोग्यासाठी काय?

  • आयुष्यमान योजनेंतर्गत 5 लाख रुपयांसह उपचारांवर 50 लाखांपेक्षा जास्त खर्च झाल्यास तो राज्य सरकार उचलेल
  • अटल मेडिसीटीची स्थापना करणार. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालये, 5 वर्षांत आणखी 2000 सिटस् जोडल्या जातील.
  • प्रत्येक जिल्ह्यात नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाईल.

Back to top button