भाजप संविधान बदलताना काँग्रेस गप्प का होती? प्रकाश आंबेडकरांचा सवाल | पुढारी

भाजप संविधान बदलताना काँग्रेस गप्प का होती? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप कार्यकाळातील भ्रष्टाचारा संदर्भात पुरावेच पुरावे असताना काँग्रेस पक्ष गप्प का आहे ? काँग्रेसवाले बोलायला तयार नाहीत. काँग्रेसचे तोंड कोणत्या मशीनने शिवले आहे. काँग्रेसवाल्यांचा भाजपसोबत छुपा समजोता आहे, असा खळबळजनक आरोप करत भाजपच्या काळात संविधान बदलत असताना काँग्रेस गप्प का होती, असा असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी उमेदवार अतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ जय भवानी शाळा मैदान येथील आयोजित सभेत अॅड. आंबेडकर बोलत होते.

यावेळी अॅड. आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सारखेच असल्याचे सांगत दोन्ही पक्षावर सडकून टीका केली. यावेळी उमेदवार अतिश बनसोडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक अध्यक्ष पांडुरंग खांडेकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी, अनिल जाधव, क्रांतीताई सावंत, प्रा. सोमनाथ साळुंखे विलास पोटफोडे, मल्लप्पा शिंदे, अनिरुद्ध वाघमारे आदी उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, भाजपची हार ही मुस्लिम समाजाच्या हाती आहे. त्यामुळे निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येत आहे. आज परिस्थिती बदलली आहे. जो भाजपचा पराभव करेल त्याला मतदान करण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन यांनी केली आहे. त्यामुळे भाजपला हरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी काम असून आमच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बोफोर्स प्रकरणी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पुरावा नसतानाही आरोप झाले, मात्र सध्या भाजपच्या कार्यकाळात अनेक प्रकरणाचे पुरावे असतानाही काँग्रेसवाले कुठल्या बिळात बसले आहेत. काँग्रेसमध्ये भाजपला अंगावर घेण्याची हिंमत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेस महाविकास आघाडी अंतर्गत जागा वाटपाबाबत बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, भंडारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उभे राहण्यास सांगितले, तरी त्यांनी उभारण्यास नकार दिला. पराभवाची त्यांना भीती होती का ? सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसने येथे उभे केले, ही तडजोडच आहे. काँग्रेसवाल्यांनी भाजपासोबत छुपा समझोता केला आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा बळी देण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळ जनक आरोप यावेळी अॅड.आंबेडकर यांनी केला आहे. वास्तविक वंचित बहुजन आघाडी हा मोठा विरोधक म्हणून उभा राहणार आहे, हे माहित झाल्यानेच अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली असल्याचेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

सन २०१९ मध्ये झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, मागील वेळी मुसलमानांनी केलेली चूक पुन्हा करू नये. समाजातील मौलवींनी आता यापुढे ओबीसी, धनगर, भटके विमुक्त यांच्याशीही संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यांची भूमिका जाणून घेणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या पलीकडे जाऊन आता आपली भूमिका त्यांनी ठरवावी, मागील निवडणुकीतील काँग्रेसच्या मतात वाढ होणार नाही. तिथे चिटकून राहाल तर भाजपाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत. परिस्थितीत बदल झाला पाहिजे. माझं मत आरक्षण वाद्यांना ही ओबीसींची भूमिका आहे. आरक्षण वाचले आणि लागू राहिले तर ते हितकारक राहणार आहे. संविधान टिकवण्याची त्यांची भूमिका हवी. लढा मोठा झाला तर तोच यश मिळू शकते. भाजपला हरवायचं की विजयी करायचं, हे आता मुसलमानांनी ठरवलं पाहिजे. दुसरीकडे वंचितला मतदान केल्यास भाजपा पराभूत होईल, हे लक्षात ठेवले पाहिजे.

काँग्रेस व भाजपची भूमिका एकच आहे. मुसलमानांना वाचविण्यासाठी कोणीही येणार नाही. पुन्हा ती चूक करू नका. संविधान संपेल हुकूमशाही सुरू होईल, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतींनी दिला होता. याचा गांभीर्याने विचार आता सर्वांनी करण्याची गरज आहे अन्यथा पुन्हा गोध्रा आणि मणिपूर घडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले सोलापुरात मुस्लिम समाजाचे अडीच लाख मतदान काँग्रेसला झाले होते. तेच मतदान जर वंचित बहुजन आघाडीला झाले असते, तर वंचित बहुजन आघाडी विजयी झाली असती. तेव्हा मुसलमानांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button