दुर्दैवी ! विजेचा धक्का लागून जुन्नरला युवा शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी

दुर्दैवी ! विजेचा धक्का लागून जुन्नरला युवा शेतकर्‍याचा मृत्यू

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा :  शेतातील कोबीला पाणी सोडण्यासाठी धरणाच्या पाण्यातील मोटार सुरू करताना येणेरे (ता. जुन्नर) येथील एका युवा शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 8) घडली. संतोष लक्ष्मण घोगरे (वय 31) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विहिरीत असलेली मोटार सुरू होत नसल्यामुळे संतोष धरणातील मोटार सुरू करण्यासाठी धरणाकडे आला. वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातील शेकडो मोटारी प्लॅस्टिक बॅरलच्या साहाय्याने पाण्यात सोडलेल्या आहेत. ही मोटारही सुरू होत नसल्याने त्याने मोटारीचा विद्युत प्रवाह बंद करून तारेचा जोड (जॉइंट) तपासण्यासाठी पाण्यात गेला. नंतर मोटारीची वायर सापडत तो पाण्याबाहेर आला. येथे असलेल्या अनेक मोटारींच्या तारा एका लाकडी खांबाला गुंडाळलेल्या असतात. येथे त्याला एका तारेचा जॉइंट निसटल्याचे आढळले. त्या तारेला हात लावताच त्याला विजेचा धक्का बसला आणि तो मृत्युमुखी पडला. त्याने नजरचुकीने दुसर्‍या तारेला हात लावल्यामुळे ही दुर्घटना घडली. त्याला तातडीने जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

शेतकर्‍यांनो, काळजी काय घ्याल?
तालुक्यातील विविध धरणे, बंधारे किंवा पाणीसाठ्यात मोठ्या संख्येने शेतकर्‍यांच्या मोटारी असतात. पूर्वी कॉपरच्या वीजवाहक तारा वापरल्या जायच्या. मात्र, चोरट्यांच्या त्रासामुळे अनेकदा अ‍ॅल्युमिनियम आदी साध्या तारा वापरल्या जातात. या तारा गरम होऊन विद्युतपुरवठा खंडित होतो किंवा अनियमित होत असतो. तसेच खेकडे, मासे आदी प्राण्यांकडून तार किंवा वेष्टण कुरतडले जाते. मग मात्र ती तार कुठे ब—ेक झाली, हे पाहण्यासाठी पाण्यात जावे लागते. अशा वेळी केवळ आपल्या मोटारीचा प्रवाह बंद न करता, महामंडळाच्या कर्मचार्‍याकडून रोहित्राचा पुरवठा बंद करावा, असे जाणकारांचे मत आहे. तसेच सर्व शेतकर्‍यांनी पाण्यातील वायरींचे जोड वॉटरफ—ुफ करणे, जोड उघडे ठेवू नयेत आदी काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

Back to top button