Stock Market Closing Bell | BSE MidCapचा नवा उच्चांक, गुंतवणूकदारांनी कमावले २ लाख कोटी | पुढारी

Stock Market Closing Bell | BSE MidCapचा नवा उच्चांक, गुंतवणूकदारांनी कमावले २ लाख कोटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात कोणताही बदल न करण्याच्या निर्णयानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. याव्यतिरिक्त, तेलाच्या किमतीतील घसरण आणि देशांतर्गत वाहन विक्रीची मजबूत स्थिती यामुळेही गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स १२८ अंकांनी वाढून ७४,६११ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४३ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,६४८ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

दरम्यान, बीएसई मिडकॅपने (BSE MidCap) आजच्या ट्रेडिंग सत्रात ४२,५६४ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर मिडकॅप ०.९ टक्क्यांच्या वाढीसह ४२,५०३ वर स्थिरावला. तर तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

क्षेत्रीय आघाडीवर ऑटो, मेटल, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्यानी वाढले. तर बँक आणि रियल्टी निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांकाने पुन्हा नवा उच्चांक गाठला.

गुंतवणूकदारांनी कमावले २ लाख कोटी

बाजारातील तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २ मे रोजी ४०८.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या मंगळवारी ३० एप्रिल रोजी बाजार भांडवल ४०६.५५ लाख कोटींवर होते. याचाच अर्थ बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात २.०७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स शेअर्स कोणते?

सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, एनटीपीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, सन फार्मा, आयटीसी हे सर्वाधिक तेजीत राहिले. तर कोटक बँक, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, विप्रो हे शेअर्स घसरले.

sensex closing
sensex closing

एनएसई निफ्टीवर बीपीसीएल, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, एसबीआय लाईफ हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर कोटक बँक, टाटा कन्झ्यूमर, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

Nifty 50
Nifty 50

गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर्स घसरले

गोदरेज समुहातील गोदरेज इंडस्ट्रीज आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांचे शेअर्स बीएसईवर आजच्या ट्रेडिंग सत्रात ७ टक्क्यांपर्यंत घसरले. देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक गोदरेज (Godrej) कुटुंबात १२७ वर्षानंतर वाटणी झाली. गोदरेज समुहाचे २ भागात विभाजित करण्याचा करार या कुटुंबाने नुकताच केला. दरम्यान, गोदरेज कंझ्युमर, गोदरेज ॲग्रोव्हेट आणि अस्टेक लाइफसायन्स सारख्या इतर सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. (Shares of Godrej group)

वेदातांचा शेअर्स नव्या उच्चांकावर

मेटल आणि मायनिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांताचे शेअर्स बीएसईवर ४१३.८० रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले. दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स ४१० रुपयांवर होता. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी चार वर्षांत २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचे शेअर्स वधारले. (Vedanta Share Price)

चौथ्या तिमाहीतील चांगल्या कमाईच्या जोरावर IndiaMart च्या शेअर्सने बीएसईवर ८ टक्क्यांनी वाढून २,८५८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार केला. (IndiaMart Share Price)

जागतिक बाजार

फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढ केली नसल्याने गुरुवारी आशियाई बाजारात तेजी राहिली. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढला. तर हाँगकाँगच्या हँगसेंग निर्देशांकात २ टक्क्यांनी वाढ झाली. टोकियोचा निक्केई सपाट राहिला. यूएस फेडने व्याजदर स्थिर ठेवले. तसेच व्याजदर कपातीला विलंब होण्याची शक्यता असल्याचेही संकेत दिले आहेत. बेंचमार्क पॉलिसी रेट जुलैपासून सध्याच्या ५.२५ टक्के- ५.५० टक्क्यांच्या श्रेणीत आहे. (Stock Market Closing Bell)

कच्चे तेल

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती एका रात्रीत जवळपास सात आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आल्या. यामुळे जगातील तिसरा सर्वात तेलाचा मोठा आयातदार आणि ग्राहक असलेल्या भारतातील महागाईची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

परदेशी गुंतवणूकदार

एनएसईच्या आकडेवारीनुसार, ३० एप्रिल रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) १,०७१.९३ कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १,४२९.११ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

हे ही वाचा :

Back to top button