Pune News : नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे काम पूर्ण होणार तरी कधी? | पुढारी

Pune News : नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे काम पूर्ण होणार तरी कधी?

माऊली शिंदे

वडगाव शेरी : नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या सात वर्षांपासून विमाननगर येथे सुरू आहे. निधीअभावी हे काम संथ गतीने सुरू असल्याने त्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसत आहे. हे काम पूर्ण होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित करीत आगामी अर्थसंकल्पात या इमारतीसाठी पुरेशा निधीची तरतूद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. क्षेत्रीय कार्यालयासाठी सध्या रामवाडी परिसरातील लाईन पार्कमध्ये भाड्याने इमारत घेतली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कर भरणा, जन्म-मृत्यू दाखले, लग्न नोंदणी कार्यालय आहे. दुसर्‍या मजल्यावर सहायक आयुक्तांचे कार्यालय आणि अभियंतांचे कार्यालय आहे. तिसर्‍या मजल्यावर आरोग्य अधिकारी, आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी बसतात. मात्र, या इमारतीची जागा अपुरी पडत होती. त्यामुळे विमाननगरमध्ये फिनिक्स मॉलजवळ क्षेत्रीय कार्यालयाची सुसज्य इमारत उभारण्याचे नियोजन प्रशासनाने केले.

2016 साली या इमारतीच्या कामास सुरुवात केली. मात्र, गेल्या सात वर्षांत निधीअभावी या इमारतीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत श्रीधर गलांडे यांनी सांगितले की, क्षेत्रीय कार्यालयाची हद्द वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी आणि कामकाजासाठी नवीन इमारतीतून कार्यालयाचे काम होणे गरजेचे आहे. पण, दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात या इमारतीसाठी पुरेशी तरतूद केली जात नाही. त्यामुळे या इमारतीचे काम रेंगाळले आहे.

क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात टपर्‍या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच परिसरात गवत व झाडे, झुडपेही वाढली आहेत. या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. महापालिकेने उर्वरित असलेली कामे तातडीने पूर्ण करून या इमारतीचा वापर सुरू करावा.
                                                            -शिवाजी वडघुले, नागरिक.

फर्निचरसह किरकोळ कामे अद्यापही बाकी
नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पण, इमारतीचे फर्निचर आणि इतर किरकोळ कामे राहिली आहेत. त्यासाठी निधी मिळाला नाही. निधी मिळाल्यानंतर ही कामे तातडीने पूर्ण केली जाणार असल्याचे भवन विभागाच्या शाखा अभियंतांनी सांगितले.

 

Back to top button