जुन्नरची राजकीय समीकरणे बदलत आहेत | पुढारी

जुन्नरची राजकीय समीकरणे बदलत आहेत

सुरेश वाणी

ओझर(पुणे) : शिवसेना  व राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीनंतर जुन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे  बदलत आहेत. प्रत्येक पक्ष आपलीच ताकद  सर्वाधिक मजबूत असल्याचा दावा करताना दिसत आहे. आमदार अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर तालुक्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवजन्मभूमी म्हणून  जुन्नर तालुका महाराष्ट्रात  सुपरिचित आहे. जुन्नर तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद  सर्वाधिक असल्याचा दावा दोन्ही नेते यापूर्वी करीत होते. वर्षापूर्वी  शिवसेना फुटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे, असे त्यांचे  नेते सांगत होते.  या पक्षाचे आमदार असल्याने साहजिकच त्या पक्षाचे पारडे  जड दिसत होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर चित्र  थोडे वेगळे पाहावयास मिळत आहे.
पवार काका-पुतणे जरी विभक्त झाले असले, तरी  जुन्नर तालुक्यात दोन्ही पवारांशी चागले सुत आ.अतुल बेनके यांनी जुळवले  आहे. दोघांनाही वाटत आहे, की आ. बेनके आपल्या सोबत आहेत. बेनके यांनी तटस्थ  राहण्याची जरी भूमिका जाहीर केली असली, तरी धाकले धनी म्हणजेच अजित पवार  यांच्याबरोबर ते जाऊ शकतात. आ.अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या सोबत  राहावे, असा जुन्या कार्यकर्त्यांचा आग्रह असला, तरी तालुक्याचा विकास  करण्यासाठी निधी लागतो आणि निधी अजित पवारच देऊ शकत असल्याने बेनके यांचा  कल अजित पवार यांच्याकडे जास्त दिसत असून, बहुतांशी कार्यकर्ते आ. बेनके जो  निर्णय घेतील तो मान्य करू शकतात.
शरद पवार 1 ऑक्टोबरला लेण्याद्री येथे बिरसा बिग्रेडने आयोजित केलेल्या आदिवासी मेळाव्यासाठी  जुन्नर तालुक्यात येणार असून, त्यांचे स्वागत आ. अतुल  बेनके करणार आहेत. याच ऑक्टोबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर  तालुक्यात येणार आहेत व त्यांचेही स्वागत आ. अतुल बेनकेच करणार आहेत. आ. बेनके  सध्या दोन्ही गटाला धरून असले, तरी त्यांना कोणता तरी एक निर्णय घ्यावाच  लागणार आहे, तो काय असणार, यावर पुढील अनेक राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. यानंतर अनेक नेते इकडे-तिकडे होण्याची शक्यता आहे.
जुन्नर तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या  शिवसेनेकडे जरी जास्त शिवसैनिक दिसत असले, तरी माजी आ. शरद सोनवणे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यावर तेही तालुक्यात मोठी फौज  सोबत  ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे एक सहकारी सचिन वाळुंज  सहकार्‍यासह मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आहेत.
हेही वाचा

Back to top button