पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांच्या गर्दीची चिंता मिटणार! | पुढारी

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांच्या गर्दीची चिंता मिटणार!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांना दररोज गर्दीचा सामना करावा लागतो. या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये अनेकदा वादावादी, हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आणि प्रवाशांना पुणे-मुंबईदरम्यानच्या प्रवासात पुरक जागा मिळावी, याकरिता पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम आता 30 टक्के पुर्ण झाले असून, त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील 2/3/6 या प्लॅटफॉर्मवर एलएचबी 24 आणि आयसीएफ 26 डब्यांच्या रेल्वे गाड्या उभ्या राहू शकणार आहेत. परिणामी, पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे प्रवाशांची जास्तीत जास्त वाहतूक करणे सोपे होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्या वाढवून देखील त्या गाड्या प्रवाशांसाठी अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे रेल्वेने हडपसर येथे नवे टर्मिनल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, प्रवाशांची ही गर्दी मुंबईकडील मार्गावरच सर्वाधिक आहे. ही गर्दी सोडविण्यासाठी आणि प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे गाडीत जागा मिळावी, याकरिता प्रशासनाने गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, डबे वाढविले तरी प्लॅटफॉर्मची लांबी कमी आहे. या प्लॅटफॉर्मवर फक्त 16 ते 18 डब्यांच्याच रेल्वेगाड्या उभ्या राहू शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीकरिता प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 आणि 6 ची लांबी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाला सुरूवात झाली असून, या सर्व कामासाठी 51.85 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

रेल्वे प्रशासनाला ही कामे करावी लागणार…

  • प्लॅटफॉर्म क्रमांक2/3/6 वर 24 आणि 26 कोचच्या गाड्या बसण्याची व्यवस्था
  • ट्रॅक काढण्यासाठी 6 दुहेरी डायमंड स्विच बसवणे
  • प्लॅटफॉर्म नंबर 3 लाईनचे युपी मेन लाईनमध्ये रूपांतरण करणे
  • प्लॅटफॉर्म नंबर 4 लाईनचे डीएन मेन लाईनमध्ये रूपांतरण करणे
  • प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 लाईनदरम्यान 2 पूर्ण लांबीच्या मालगाड्या उभ्या राहतील, असे बांधकाम करणे

आत्तापर्यंत पुर्ण झालेली कामे…

  • लाईन क्रमांक 6 ची लांबी मुंबईच्या दिशेला वाढविली
  • लाईन क्रमांक 8 ला नवीन वॉशिंग सायडींगपर्यंत जोडले
  • 300 मीटर ट्रॅकच्या लांबीच्या जागेची सिव्हींग पूर्ण झाले
  • 1 किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅक पॅकींगचे काम पूर्ण झाले
  • ओव्हर हेड वायर बसविण्याचे कंत्राट दिले आहे.
  • नवीन रिले रूम तयार करण्यासाठी डेटा लॉगर आणि फ्युज अलार्म शिफ्टींगचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा

पुण्यात पाकिस्तानच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

Balasaheb Thorat : पक्षांतर बंदी कायद्याचे पालन होत नाही : आ. थोरात

Ganeshotsav Nashik : साडेपाचशे गणेश मंडळांचे परवानगीसाठी अर्ज, २३२ मंडळांना परवानगी

Back to top button