Parth Pawar : पार्थ पवारांसाठी शिरूर मतदारसंघाचीही चाचपणी | पुढारी

Parth Pawar : पार्थ पवारांसाठी शिरूर मतदारसंघाचीही चाचपणी

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : अगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या जिल्ह्यात अनेक राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात थेट पवार कुटुंबच आमने-सामने येणार असल्याची चर्चा आहे. परंतु बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोध लढण्यापेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ अधिक सोपा व सोयीचा असल्याची चर्चा असल्याने त्यांच्यासाठी शिरूर लोकसभेची ही गेले काही महिन्यांपासून चाचपणी सुरू आहे.

राज्याच्या राजकारणातील महानाट्यानंतर राज्यात भाजप- सेने सोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिरूर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील अनेक राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे नेते शरद पवार यांच्याच घरामधून बंडखोरी करतअजित पवार बाहेर पडले. राज्यातील पक्षाचे मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. मतदारसंघातील शिरूर विधानसभा आमदार अशोक पवार वगळता सर्व आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे.

शिरूर लोकसभा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा आंबेगाव- शिरूर मतदारसंघ, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, हडपसरचे आमदार चेतन तुपे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. तर, भोसरी विधान सभा मतदारसंघात पूर्वीपासून मोठ्याप्रमाणात अजित पवार समर्थक आहेत.

शरद पवार यांच्या सोबत शिरूरचे आमदार असले तरी सध्या भाजपमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हेदेखील अजित पवार समर्थक असल्याने शिरूर विधनसभा मतदारसंघात देखील पवार यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो. यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांना अधिक सोपा व सोयीचा असल्याची चर्चा आहे. पक्ष पातळीवरदेखील पार्थ पवार यांच्यासाठी शिरूरची अनेक दिवसांपासून चाचपणी सुरू आहेच. शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात कुणाला मिळणार, यावर अनेक राजकीय गणित ठरणार आहेत. परंतु यामुळेच शिरूर लोकसभेच्या लढतीवर देखील राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Baramati News : कोंबड्यांनी माना टाकल्या; वाढत्या उन्हाचा परिणाम

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांच्या गर्दीची चिंता मिटणार!

ठाणे परिवहनचे कर्मचारी संपावर; सकाळपासून शंभर फेर्‍या रद्द

Back to top button