पूजा साहित्याच्या खरेदीसाठी लगबग | पुढारी

पूजा साहित्याच्या खरेदीसाठी लगबग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत असून, उत्सवाच्या खरेदीसाठीची लगबगही बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. उत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठीही गर्दी होत असून, कापरापासून ते उदबत्तीपर्यंत… हळदी-कुंकवापासून ते अष्टगंधापर्यंत… अशा सर्वच साहित्याची खरेदी केली जात आहे. यंदा श्री गणेश पूजेसाठी लागणार्‍या साहित्याचा बॉक्स आणि सत्यनारायण पूजेसाठी लागणार्‍या साहित्याच्या बॉक्सला मागणी आहे. गौरी पूजेसाठी लागणार्‍या साहित्यांच्या खरेदीलाही महिला-युवती प्राधान्य देत आहेत.

उत्सवाच्या आठवडाभरापूर्वीच लोकांनी पूजेच्या साहित्याच्या खरेदीवर भर दिला आहे. व्यावसायिकांकडे पूजेच्या साहित्याचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. यंदा पूजेच्या साहित्य खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. पूजेच्या साहित्याच्या बॉक्सची जास्त मागणी असून, बॉक्समध्ये हळदी-कुंकवापासून ते फुलवातींपर्यंतच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. या बॉक्सची किमत 200 ते 400 रुपयांपर्यंत आहे. एकत्रितपणे पूजेचे साहित्य एकाच बॉक्समध्ये असल्याने या बॉक्सला मागणी वाढली आहे.

याशिवाय हळदी-कुंकू, बुक्का, कापूर, आसन, उपरणे, शेंदूर, अष्टगंध, वस्त्र, समई वाती, आरती पुस्तिका, उदबत्ती, फुलवाती, कापूस, रांगोळी… अशा साहित्याच्या खरेदीलाही मागणी आहे. याचबरोबर पूजेसाठीचे कापड, आर्टिफिशिअल फुले, हार, तोरण हेही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पूजेच्या साहित्याची किमत 20 रुपयांच्या पुढे आहे. पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार पेठेसह मंडईमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

व्यावसायिक धनंजय घोलप म्हणाले, पूजेच्या साहित्याच्या खरेदीला उत्सवाच्या आठवड्याभरापूर्वीच सुरुवात झाली आहे. यंदा श्री गणेश पूजेसाठीचा बॉक्स आणि सत्यनारायण पूजेसाठीच्या बॉक्सला मोठी मागणी आहे. तर इतर साहित्याची खरेदीही लोक करत असून, शहरातीलच नव्हे ग्रामीण भागातील लोकही खरेदीसाठी येत आहेत. नीलेश मते यांनी गणेशोत्सवात पूजेच्या साहित्याच्या खरेदी मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी या साहित्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. या साहित्याच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे सांगितले.

खरेदीसाठी रविवारी मोठी गर्दी
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने पुणेकरांनी खरेदीचे निमित्त साधत मनसोक्त खरेदी केली. रविवार पेठ, मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता येथे खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये खरेदीसाठी महिला-युवतींनी गर्दी केली. सजावटीच्या साहित्यासह गौरीपूजेसाठी लागणार्‍या साहित्याची खरेदीही त्यांनी केली.

पूजा साहित्य विक्रीसाठी ऑनलाइन प्रसिद्धी
व्यावसायिकांकडून पूजेच्या साहित्याच्या विक्रीसाठी ऑनलाइन प्रसिद्धीही केली जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअ‍ॅपवर त्याबाबत प्रसिद्धी केली जात असून, छायाचित्रे, व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी चक्क काही व्यावसायिकांनी पूजेचे साहित्य घरपोच पोचविण्यासाठीची सेवाही उपलब्ध करून दिली आहे.

 हे ही वाचा :

एकाच वर्षात 777 चित्रपट पाहण्याचा विश्वविक्रम

चीनमध्ये पाचव्या मजल्यावर उभारले पेट्रोल पंप!

Back to top button