एकाच वर्षात 777 चित्रपट पाहण्याचा विश्वविक्रम | पुढारी

एकाच वर्षात 777 चित्रपट पाहण्याचा विश्वविक्रम

न्यूयॉर्क : गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील चित्रपट शौकीन झॅच स्वोप याने एकाच कॅलेंडर वर्षात 777 चित्रपट पाहण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. जुलै 2022 ते जुलै 2023 या कालावधीत त्याने हा विश्वविक्रम साकारला आणि आता त्याला रीतसर मान्यता दिली गेली आहे. यापूर्वी एकाच वर्षात सर्वाधिक चित्रपट पाहण्याचा मागील विश्वविक्रम फ्रान्सच्या विन्सेंट क्रोन्हच्या खात्यावर होता. विन्सेंटने 2018 मध्ये एकाच कॅलेंडर वर्षात 715 चित्रपट पाहिले होते.

32 वर्षीय झॅचला चित्रपट पाहण्याचे त्यापेक्षाही अधिक वेड असून यापूर्वीही त्याने दरवर्षी किमान100 ते 150 चित्रपट पाहिले आहेत. जुलैपर्यंतच्या वर्षभरात त्याने वैविध्यपूर्ण चित्रपट पाहण्यास पसंती दिली. त्याने ‘मिनियन्स : राईज ऑफ गुरू’ या चित्रपटानेे आपल्या विश्वविक्रमाचा श्रीगणेशा केला आणि ‘इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी’ या चित्रपटाने विश्वविक्रमाची थाटात सांगता केली.

झॅचने चित्रपट पूर्ण पाहिलेला आहे, याची खातरजमा करून घेण्यासाठी गिनिज रेकॉर्डस्चे प्रतिनिधी वर्षभर त्याच्या अवतीभवती असायचे आणि अशा प्रकारे या विक्रमाची माहिती एकत्रित ठेवली जात होती. सदर चित्रपट पाहताना झॅचला तेथे डुलकी घेण्याची किंवा अगदी आपला फोन पाहण्याचीही परवानगी नव्हती. इतकेच नव्हे तर चित्रपट पाहताना त्याला काहीही खाण्याची किंवा पिण्याचीही मुभा नव्हती.

झॅचने बहुतांशी सामने रिगल सिनेमाज येथे पाहिले. यासाठी त्याने रिगल अनलिमिटेड मेंबरशिपचा वापर केला. जेणेकरून त्याचा चित्रपट पाहण्याचा महिन्याचा खर्च केवळ 22 डॉलर्सच्या आसपास राहिला. झॅचची कार्यालयीन वेळ सकाळी पावणेसात ते दुपारी पावणेतीन अशी होती. इतके झाल्यानंतर तो दिवसातून जास्तीत जास्त 3 चित्रपट पहायचा. विकेंडला ही संख्या अर्थातच अधिक वाढत असे, असे गिनिज रेकॉर्डस्ने पुढे म्हटले आहे.

Back to top button