चीनमध्ये पाचव्या मजल्यावर उभारले पेट्रोल पंप! | पुढारी

चीनमध्ये पाचव्या मजल्यावर उभारले पेट्रोल पंप!

बीजिंग : एरवी चीन आपल्या एकापेक्षा एक शोधासाठी ओळखला जातो. त्यांचे नवनवे शोध अवघ्या जगाला स्तंभित करून जातात. आता त्यांचे शोध वेगळे असतात, पण त्याचा दर्जा खूपच खराब असतो. याचमुळे जागतिक बाजारात आजच्या घडीला देखील चिनी उत्पादनावर फारसा विश्वास ठेवला जात नाही. भारतात तर अनेकदा विविध कारणांमुळे चिनी उत्पादनांवर बंदीची मागणीही होत आली आहे. यादरम्यान चीनने आपल्याच देशात एका इमारतीच्या चक्क पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप उभारत अवघ्या जगाला आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे.

चीनमधील पाचव्या मजल्यावर, टेरेसवर साकारलेल्या या पेट्रोल पंपचा व्हिडीओ रविवारी दिवसभर बराच व्हायरल होत राहिला. पण, इमारतीच्या टेरेसवर असलेल्या या पंपपर्यंत वाहने पोहोचणार कशी, हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच होते. मात्र, या छायाचित्रात पेट्रोल पंपवर काही वाहने असल्याचे दिसून येते आणि हा पंप उभारण्यापूर्वी चीनने तिथवर वाहने कशी पोहोचतील, याचीही तजवीज केल्याचे सुस्पष्ट झाले. या इमारतीचा पुढील भाग खालून सुरू होतो आणि तेथूनच वाहनाची आत एन्ट्री होते आणि ती अगदी वरपर्यंत पोहोचतील, अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे.

चीनमधील चोंगकिंग येथे उभारलेल्या पेट्रोल पंपची जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र, जेथे रस्त्याच्या बाजूला असणार्‍या पेट्रोल पंपवर सहजपणे पेट्रोल भरता येते, अशा वेळी लोक या पाचव्या मजल्यावरील पेट्रोल पंपकडे का जातील, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही!

Back to top button