पीएमपीवर नाही मेट्रोचा परिणाम ! उलट उत्पन्नात वाढच | पुढारी

पीएमपीवर नाही मेट्रोचा परिणाम ! उलट उत्पन्नात वाढच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी आणि मेट्रोमध्ये स्पर्धा लागणार, मेट्रामुळे पीएमपीचे प्रवासी आणि उत्पन्न संख्या कमी होणार, पीएमपी डबघाईला येणार, अशी जोरदार चर्चा शहरात सुरू होती. मात्र, पीएमपीला मेट्रो सुरू झाल्यावर कोणताही फरक पडला नसून, पीएमपीच्या उत्पन्नात आणि प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. पीएमपीची पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे आणि पीसीएमसी ते फुगेवाडी अशी मेट्रो सेवा सुरू झाली. त्या वेळी पुणेकर ही नवी मेट्रो पाहाण्यासाठी यायचे कालांतराने या मार्गावरील प्रवाशांची संख्या खूपच घटली.

परंतु, 1 ऑगस्टपासून मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाला. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात कोथरूडकरांना वनाज ते पीसीएमसीपर्यंत आणि पुणे स्टेशनपर्यंत थेट प्रवास करता येत आहे. त्यामुळे एकेकाळी फुलराणी बनलेल्या मेट्रोचा आता पुणेकर प्रवासी आता खर्‍या अर्थाने प्रवासासाठी वापर करत असून, दिवसाला सुमारे 30 हजारांच्या घरात प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे पीएमपी प्रवाशांवर परिणाम होतो की काय? असा प्रश्न पडला होता. मात्र, याचा अभ्यास दै.‘पुढारी’ने नुकताच केला. त्या वेळी पीएमपी प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

28 जुलै रोजीची मेट्रो सुरू होण्यापूर्वीची स्थिती…
प्रवासी संख्या: 80,177
उत्पन्न : 12,55,365

5 ऑगस्ट 2023 रोजीची मेट्रो सुरू झाल्यानंतरची स्थिती…
प्रवासी संख्या : 80,662
उत्पन्न : 12,80,434

असा केला अभ्यास
पीएमपीच्या वनाज ते पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गांवर दिनांक 1 ऑगस्टपूर्वी दैनंदिन किती प्रवासी संख्या होती आणि 1 ऑगस्टनंतर मेट्रो सुरू झाल्यावर किती प्रवासी संख्या झाली, त्याचा उत्पन्नावर काय परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरून पीएमपी प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी काही प्रमाणात वाढल्याचे दिसले.

पीएमपी आणि मेट्रो एकमेकांना स्पर्धक नाहीत. दोघेही एकमेकांना पूरक अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवत आहेत. त्यामुळे आमच्या प्रवासी संख्येवर आणि उत्पन्नावर कोणताही परिणाम झालेला नाही.
– सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

हेही वाचा :

Karnataka | चित्रदुर्गमध्ये भीषण अपघात, ट्रकला कारची धडक, ४ ठार, ३ जखमी

पुणे : परवाना न मिळाल्याने यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत 15 रुग्ण

Back to top button